होमपेज › Solapur › पंढरीत मराठा आंदोलकांनी पोलिस आणि पत्रकारांना बांधले मैत्रीचे धागे

पंढरीत मराठा आंदोलकांनी पोलिस आणि पत्रकारांना बांधले मैत्रीचे धागे

Published On: Aug 05 2018 10:15PM | Last Updated: Aug 05 2018 10:15PMपंढरपूर : प्रतिनिधी

 राज्यभरात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि आंदोलकांमध्ये अविश्वास आणि तणाव निर्माण झालेला असताना पंढरपूर येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनावेळी आंदोलकांनी मैत्री दिनाचा मुहूर्त गाठून पोलिस आणि पत्रकारांना मैत्रीचे धागे बांधून सौहार्दाचे वातावरण निर्माण केले आहे. विशेष म्हणजे पोलीस आणि पत्रकारांनी या मैत्रीच्या धाग्याचे मोठ्या आनंदनाने स्वागत करून आंदोलकांना धन्यवाद दिले आणि आंदोलन यशस्वी व्हावे आशा शुभेच्छा दिल्या. 

पंढरपूर येथे तहसील कार्यालयासमोर 2 ऑगस्ट पासून पंढरपूर मराठा क्रांती मोरच्याच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. चार दिवस दररोज हजारावर आंदोलक दिवसभर ठिय्या मारुन बसत आहेत. शांततेत आणि घोषणाबाजी, भजन, कीर्तन,भारुड, प्रवचन, कायदेविषयक वकिलांचे मार्गदर्शन, बाल वक्त्यांची भाषणे, अशा पद्धतीने दररोज वाढत्या सहभागाने आंदोलन सुरू आहे. एकही प्रसंग तणावाची स्थिती निर्माण होणार नाही याची आंदोलकांनी काळजी घेतल्यामुळे आंदोलन व्यापक आणि प्रभावी ठरत आहे. पोलिस बंदोबस्त मोठा असला तरी खेळीमेळीचे वातावरण पाहून पोलिस पण तणावमुक्त झाले आहेत. 

अशा पार्श्वभूमीवर रविवारी मैत्री दिवस आहे हे लक्षात येताच आंदोलकांनी मैत्रीचे प्रतीक गुलाबी धागे आणले आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना बांधले. तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांना महिला आंदोलकांच्या हस्ते हे धागे बांधले गेले. आंदोलनास सकारात्मक प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात देऊन आंदोलन लोकांपर्यंत आणि शासन दरबारी पोहोचवले म्हणून यावेळी पत्रकारांनाही मैत्रीचे धागे बांधून मराठा आंदोलकांनी त्यांचेही ऋण व्यक्त केले आहेत.

मैत्रीच्या या धाग्यामुळे पोलिस आणि पत्रकार बांधवही आनंदीत झाल्याचे दिसून आले.