Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Solapur › मराठा आंदोलन; मोहोळमध्ये दोन बस फोडल्या

मराठा आंदोलन; मोहोळमध्ये दोन बस फोडल्या

Published On: Jul 22 2018 4:15PM | Last Updated: Jul 22 2018 4:15PMमोहोळ : वार्ताहर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आषाढी एकादशीच्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत असून या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे रविवारी २२ जुलै रोजी जमावाने दोन एसटी बसवर तुफान दगडफेक करुन बसचा चक्काचुर केला. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विठ्ठलाच्या महापुजेसाठी पंढरपूर येथे येणार होते. मात्र मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय त्यांना पंढरपुरमध्ये विरोध करण्याची भूमिका मराठा समाजाच्या विविध संघटनांनी जाहीर केली आहे. यापूर्वी मराठा समाजाने शांततेत मुक मोर्चे काढून सरकारचा निषेध केला होता. मात्र सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा समाजातील कायकर्त्यांनी यापुढे हल्ला बोल, गनिमी कामा व ठोक मोर्चा असे आंदोलन सुरु केले आहे.

२२ जुलै रोजी सकाळी साडे आकरा वाजता मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर चौकात मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. यावेळी राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसवर आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. यावेळी बसचे चालक आणि वाहकांनी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या दगड फेकीत पंढरपूर आगाराच्या मंद्रुप-पंढरपूर बस क्र. एम.एच.१४. बी.टी. ०४६९ आणि पंढरपूर- पूळुजवाडी बस क्र. एम.एच. १२ इ.एफ. ६७९७ या बसच्या काचा फूटून अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पाहिल्या बसचे चालक अर्जुन भुजंगा गाडवे रा.पुळुजवाडी ता.पंढरपूर यांच्यासह वाहक सुर्यकांत अर्जुन उन्हाळे रा. फुलचिंचोली ता.पंढरपूर आणि दुसऱ्या बसचे चालक दिगंबर मारुती कोले रा. नारायण चिंचोली ता.पंढरपूर यांच्यासह वाहक तुकाराम महादेव चव्हाण हे किरकोळ जखमी झाले आहेत.

या घटने नंतर मोहोळ पोलिसांनी बंदोबस्त कडक केला असून विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. या प्रकरणी मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. आंदोलनांमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.