Fri, Apr 26, 2019 03:42होमपेज › Solapur › पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनास प्रारंभ

पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन

Published On: Aug 02 2018 12:47PM | Last Updated: Aug 02 2018 12:47PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज, गुरुवार पासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील गावांचा सहभाग असून शेकडो आंदोलक तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या मारून बसले आहेत. दरम्यान पंढरपूर शहरातील मराठा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून  मशाल रॅली काढून या आंदोलनास उपस्थिती दर्शवली. 

सकाळी १० वाजता आंदोलनास सुरुवात करताना मराठा आरक्षण आंदोलनावेळी बलिदान दिलेल्या सर्व समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनादरम्यान भजन सुरू करण्यात आले असून यावेळी भाळवणी जिल्‍हा परषिद गटातील समाजातील ज्येष्ठ, युवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलन स्थळी, तहसील कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उद्या दि. ३ ऑगस्ट रोजी वाखरी जिल्‍हा परिषद गटातील सर्व गावांचा ठिय्या आंदोलनात सहभाग असणार आहे.