Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Solapur › सोलापुरात दोघा मंत्र्यांच्या घरांवर धडक मोर्चा

सोलापुरात दोघा मंत्र्यांच्या घरांवर धडक मोर्चा

Published On: Jul 27 2018 11:47PM | Last Updated: Jul 27 2018 11:23PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन पेटले असताना पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी आलेले वारकरी सुरक्षित घरी परतावेत यासाठी सोलापुरातील मराठा समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांसाठीचे आंदोलन उशिराने सुरू केले. शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर धडक मोर्चाने प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून ‘आसूड मारो’ आंदोलन केले. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता.

सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा  काढण्यात आली व आसुडाचे फटके मारण्यात आले.     

पोलिसांनी दोन्ही मंत्र्यांच्या सोलापुरातील घरांसमोर तगडा बंदोबस्त लावला होता. त्यामुळे आंदोलक मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. घराजवळील परिसरात मुख्य रस्त्यावर आंदोलकांनी आंदोलन केले. यावेळी सकाळी काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाच्या ठिकाणी सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून सरकारचा खरपूस समाचार घेताना मागण्या तातडीने पूर्ण करण्याचा इशारा दिला.

सकल मराठा समाजाच्या या आंदोलनानंतर आता मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी रुपाभवानी मंदिरात जागरण-गोंधळ असून सोमवार, 30 जुलै रोजी सोलापूर बंद पुकारले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोलापुरातील वातावरण गंभीरच राहणार आहे.