Sun, Jul 21, 2019 16:16
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › 2 ते 8 ऑगस्ट पंढरपूर तहसीलसमोर ठिय्या

2 ते 8 ऑगस्ट पंढरपूर तहसीलसमोर ठिय्या

Published On: Jul 30 2018 1:33AM | Last Updated: Jul 29 2018 10:42PMपंढरपूर : प्रतिनिधी 

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येत्या 2  ते 8 ऑगस्ट दरम्यान  तालुक्यातील सर्वच गावांतील मराठा समाजाचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार असून 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण तालुक्यात चक्काजाम आंदोलन नियोजीत करण्यात आले आहे. आषाढी यात्रेमुळे तालुक्यात थंडावलेले आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पेटू लागले असून आज वाखरीत रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. 

राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षण आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यासह अन्य तालुक्यातही आंदोलन जोरात असताना पंढरपूर शहर व तालुक्यात मात्र आषाढी यात्रेमुळे आंदोलन स्थगित ठेवण्यात आले होते. आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यात यश मिळाल्यामुळे तालुक्यातील आंदोलकांतून उत्साहाचे वातावरण आहे. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन तीव्र करून राज्य सरकारला आरक्षणविषयक निर्णय घ्यायला भाग पाडायचे या निर्धाराने तालुक्यातील मराठा समाजातील युवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी शेतकरी, व्यापारी, डॉक्टर, वकील एकवटू लागले आहेत. तालुक्यात अभूतपूर्व अशा स्वरूपाचे आंदोलन उभा केले जात आहे. 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती असून त्या जयंती सोहळ्यात अडथळा नको म्हणून 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटानुसार सर्व गावांतील मराठा युवक आणि नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहे. 

दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन 7 दिवस चालणार आहे. तालुक्यातील सर्व जि.प.गटातील प्रत्येक गावातील नागरिक या ठिय्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यात गावोगावी आंदोलनाची जनजागृती सुरू झालेली आहे. गट, तट, राजकीय पक्ष विसरून समाजातील युवक आंदोलनाच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. सध्या तालुक्याच्या विविध गावांतून आंदोलन सुरूच असून अनेक गावांनी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, गाव बंद आंदोलन सुरू आहे. सुस्ते येथे 5 युवकांनी बेमुदत  उपोषण सुरू केले होते मात्र लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकार्‍यांच्या विनंतीला मान देऊन तिसर्‍या दिवशी हे आंदोलन मागे घेतले गेले. 

दरम्यान शनिवारी सुस्ते येथे एका युवकाने भीमा नदीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. सचिन शिंगणे या युवकाने भीमा नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला वाचवण्यात यश आले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर आता तालुक्यातील प्रत्येक गावात आंदोलनाने जोर धरलेला आहे. तहसील कार्यालयासमोर 7 दिवस चालणार्‍या ठिय्या आंदोलना दरम्यान शेती, व्यवसाय, आरक्षण, मराठा समाजापुढचे प्रश्‍न, शेतीला सक्षम पर्याय आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत. 9 ऑगस्ट रोजी तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून त्यासंदर्भातील नियोजन मराठा क्रांती मोर्चाची समन्वय समिती करीत आहे. 

पंढरपूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार्‍या गावांची नावे आणि त्यांच्या नियुक्त तारखा
  गुरूवार दि. 2 ऑगस्ट सकाळी 9 वा. 

भाळवणी, केसकरवाडी, शेंडगेवाडी, जैनवाडी, धोंडेवाडी, सुपली, पळशी, तिसंगी, सोनके, गार्डी, लोणारवाडी, उपरी.
  शुक्रवार दि. 3 ऑगस्ट सकाळी 9 वा. 

वाखरी, भंडीशेगाव, कौठाळी, शिरढोण, खेडभाळवणी, पिराची कुरोली, पट. कुरोली, उजनी वसाहत, देवडे, आव्हे, तरटगांव, वाडीकुरोली,  शेळवे, सुगांव 
  शनिवार दि. 4 ऑगस्ट सकाळी 9 वा. 

कासेगाव, अनवली, सरकोली, ओझेवाडी, नेपतगांव, रांझणी, सिद्धेवाडी, तरटगांव, चिचुंबे, एकलासपूर, शिरगांव.
  रविवार दि. 5 ऑगस्ट सकाळी 9 वा. 

रोपळे, मेंढापूर, तुंगत, पांढरेवाडी, बाभुळगांव, सुस्ते, मगरवाडी, तारापूर, बिटरगांव, अजनसोंड, ईश्‍वर वठार, ना. चिंचोली, देगांव.
पंढरपूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार्‍या गावांची नावे आणि त्यांच्या नियुक्त तारखा

  सोमवार दि. 6 ऑगस्ट सकाळी 9 वा. 
भोसे, सुगांव भोसे, खेडभोसे, व्होळे, शेवते, नेमतवाडी, गुरसाळे, वेणुनगर, टाकळी (पून.), आढीव, शेगांव दुमाला, भटुंबरे, चिंचोली भोसे, अजोती, चिलाईवाडी. 
  मंगळवार दि. 7 ऑगस्ट सकाळी 9 वा. 

करकंब, बार्डी, जाधववाडी, खरातवाडी, उंबरे, करोळे, कान्हापूरी, जळोली, सांगवी, बादलकोट, पेहे, नांदोरे, गोपाळपूर, चळे, आंबे, कोंढारकी, मुंढेवाडी, पुळूज, पुळूजवाडी, शंकरगांव, नळी, आंबेचिंचोली, विटे, फुलचिंचोली, पोहोरगांव, खरसोळी.

 बुधवार दि. 8 ऑगस्ट सकाळी 9 वा. 
ल. टाकळी, गादेगाव, कोर्टी, खर्डी, तनाळी, त. शेटफळ, तावशी, उंबरगांव, बोहाळी.

वाखरीत आज रास्ता रोको, गाव बंद आंदोलन
 दरम्यान, वाखरी येथे आज (  सोमवारी ) रास्ता रोको आणि संपूर्ण गाव बंद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून वाखरी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू होणार असून संपूर्ण दिवसभर गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भात पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याला एक निवेदनही देण्यात आले आहे.