Thu, Jul 18, 2019 00:26होमपेज › Solapur › मंगळवेढ्यात सहकार मंत्र्याची गाडी अडवली, सहकार मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना फोन(व्हिडिओ)

मंगळवेढ्यात सहकार मंत्र्याची गाडी अडवली, सहकार मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना फोन(व्हिडिओ)

Published On: Jul 22 2018 12:13PM | Last Updated: Jul 22 2018 12:21PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यात मराठा मोर्चाच्या आंदोलनाची धग तीव्र होत आहे. आज (दि. २२ जुलै)सकाळी चक्‍का जाम सुरु झाले आहे. आंदोलकांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची सोलापूर मंगळवेढा महामार्गावर सकाळी दहा वाजता गाडी अडविली. एक तासानंतर सहकारमंत्र्यांनी आंदोलकांच्या गराड्यातून कशीबशी सुटका करुन घेत गाडी परत नेली. 

माचणुर येथे आंदोलन सुरु असताना सहकार मंत्री सुभाष देशमुख हे या महामार्गावरून जात होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला. त्‍यामुळे देशमुख गाडीतून खाली उत्तरले आणि आंदोलन कर्त्यांची समजूत काढू लागले. मात्र, आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आपल्या मोबाइलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फ़ोन करत थेट आंदोलकांशी बातचीत करून दिली. यात फडणवीस यांनी आयोगकडून अहवाल उच्च न्यायालयात जाईल मग न्यायालय निर्णय देईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल. असे सांगताच आंदोलनातील युवकांनी आपण आरक्षण मिळाल्या नंतरच आषाढ़ी पुजेला या असे म्हणताच मोबाइल बंद केला गेला. यावर देशमुख म्हणाले पुढील आषाढ़ी पर्यंत आरक्षणाचा निर्णय होईल, नाही झाल्यास मी राजीनामा देईन. त्यावर आंदोलकांनी पुढील वर्षी निवडणुका आहेत तुम्हाला राजीनामा देण्याची गरज राहणार नाही, असे सांगत तासभर सहकार मंत्र्याना सोडले नाही. एक तासांनतर सहकार मंत्री कसबसे त्या चक्का जाम गराड्यातून बाहेर पडले.

दरम्यान, माचनूर येथील आंदोलकांनी टायर पेटवून देत आंदोलन तीव्र केले आहे. यामुळे या महामार्गावरील वाहनांना वाट काढून पुढे जाता येत नसल्याने वाहनांच्या ३ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. आठ टायर पेटवल्याने रस्ता बंद पडला असून, या हिंसक आंदोलनाने मराठा समाजाच्या उद्रेकाला सुरुवात झाली आहे. याची सर्वात जास्त तीव्रता सोलापूर जिल्ह्यातून होत आहे. आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला काळे फासले आहे.