Thu, Jun 27, 2019 17:58होमपेज › Solapur › पंढरपूर तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले

पंढरपूर तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले

Published On: Aug 01 2018 1:36AM | Last Updated: Jul 31 2018 11:06PMपंढरपूर : प्रतिनिधी

राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा भडका पंढरपूर तालुक्यातही उडाला असून गेल्या 15 दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात ग्रामीण भागात सुरू असलेल्या या आंदोलनाने आता व्यापक स्वरूप धारण केले आहे.  दि. 2 ऑगस्टपासून येथील तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील सर्व गावांचे जि.प.गटवार ठिय्या आंदोलन सुरू होत आहे. तसेच 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण तालुक्यात चक्का जाम आंदोलन करून सर्वच रस्ते वाहतूक आणि रहदारी खंडित करण्याचे नियोजन केले आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता राज्यभरात गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पंढरपूर शहरातही आषाढी यात्रेच्या तोंडावर आंदोलनाचे शिंग फुंकण्यात आले आहे. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण जाहीर केल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी श्री. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला येऊ असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या महापुजेपासून वंचित रहावे लागले आहे. दरम्यानच्या काळात आषाढी यात्रेमुळे संपूर्ण तालुक्यात आंदोलन स्थगित करण्यात आले होते. 27 जुलै रोजी आषाढी यात्रेची अधिकृत सांगता झाल्यानंतर तालुक्यात पुन्हा एकदा आरक्षण आंदोलन उभा राहिले आहे.तालुक्यात गेल्या 15 दिवसांत 40 ते 50 एस.टी. बसेसची तोडफोड करण्यात आली असून  रस्त्यावर टायर्स पेटवून वाहतूक बंद पाडणे, जलसमाधी, उपोषण, रास्ता रोको, गाव बंद ठेवणे, चक्का जाम, मुंडन आंदोलन, राज्य सरकारचे दशक्रिया विधी घालणे, ग्रामपंचायतीला टाळे ठोकणे, एस.टी. बसेस फोडणे आदी स्वरूपाची आंदोलने सुरू झालेली आहेत. या आंदोलनामुळे तालुक्यातील जनजीवन गेल्या पाच दिवसांपासून प्रभावीत झाले असून ग्रामीण भागातील बहुतांश एस.टी. बसेसच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासीवर्गाचीही गैरसोय होत आहे. हे आंदोलन थांबावे याकरिता पोलीस प्रशासन प्रयत्न करीत असले तरी त्यांना कसलाही प्रतिसाद आंदोलकांकडून दिला जात नाही. त्यामुळे आंदोलनावर कुणाचेही नियंत्रण राहिले नाही. सर्व सामान्य माणसाने, युवकांनी आंदोलन हाती घेतल्यामुळे राजकीय पदाधिकारी, नेते मंडळी हतबल झालेले दिसत आहेत. त्यातच उद्यापासून ( दि. 2 जुलै ) पासून पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर जिल्हा परिषद गटवार गावांतील कार्यकर्ते आंदोलनासाठी ठिय्या मारून बसणार आहेत. तालुक्यातील सर्व आठही जि.प.गटातील प्रत्येक गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहे.  एकंदरीत या आंदोलनाची तयारी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू असून गावो-गावी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार, प्रचार केला जात आहे. तसेच गावो-गावी नियोजन बैठका सुरू झालेल्या आहेत. आता नाही तर कधीच नाही या निर्धाराने तालुक्यातील मराठा समाज जागृत होऊन आंदोलनासाठी तयारी करू लागला असल्याचे दिसते.

आपली शिदोरी आपणच आणा
ठिय्या आंदोलन दिवसभर चालणार असून आंदोलकांनी येताना आपली स्वत:ची शिदोरी स्वत: सोबत आणावी असेही आवाहन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे. आंदोलन ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

लोकवर्गणीतून होणार आंदोलन
या आंदोलनासाठी कुठल्याही राजकीय नेत्याची अर्थिक मदत घेण्यात येणार नाही असे ठरवून पूर्णपणे लोकवर्गणीतून आंदोलनाचा खर्च करण्याचेही निश्‍चीत करण्यात आलेले आहे. 

उद्यापासून आठवडाभर तहसीलसमोर ठिय्या आंदोलन
 उद्या ( दि. 2 जुलै ) भाळवणी जि.प.गट, 3 जुलै  रोजी  वाखरी जि.प.गट, 4 जुलै रोजी  कासेगाव जि.प.गट, 5 जुलै रोजी रोपळे जि.प.गट, 6 जुलै रोजी भोसे जि.प.गट, 7 जुलै रोजी करकंब आणि गोपाळपूर जि.प.गट तर 8 जुलै रोजी लक्ष्मी टाकळी जि.प.गटातील गावे तहसील कार्यालयासमोर येऊन दिवसभर ठिय्या आंदोलन करणार आहेत.  9 ऑगस्ट  क्रांतिदिनी संपूर्ण तालुकाभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

ठिय्या आंदोलनादरम्यान प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन 

2 जुलै ते 8 जुलै दरम्यान तहसीलसमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर दिवसभर अधुनिक आणि किफायतशीर शेतीचे मार्ग, डाळींब, ऊस, द्राक्ष आदी विषयांसह मराठा, धनगर आरक्षण आणि कायदेशीर बाजू, उद्योग, शिक्षण आदी विविध विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसेच याठिकाणी आध्यात्मिक प्रवचन, शाहिरी पोवाड्याचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिय्या आंदोलना दरम्यान शेतकर्‍यांचे प्रबोधन व्हावे असाही प्रयत्न केल्याचे दिसून येते.