होमपेज › Solapur › करमाळ्यात तिरडी मोर्चा; मराठ्यांचा आक्रोश

करमाळ्यात तिरडी मोर्चा; मराठ्यांचा आक्रोश

Published On: Jul 31 2018 1:38AM | Last Updated: Jul 30 2018 11:04PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी 

सकल मराठा समाजाच्यावतीने  करमाळा शहरातील पोथर नाका  येथून हजारोंच्या संख्येने तिरडी मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री व शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून करमाळा तहसील कार्यालयासमोर दहन करण्यात आले.

या मोर्चामध्ये मराठा आरक्षणाच्या  मागणीविषयी मोर्चामध्ये  सहभागी मोर्चेकर्‍यांनी मोठमोठ्या घोषणा देऊन शासनाला लाखोली वाहिली. मराठा आरक्षणसंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा  22  वा अहवाल व न्यायमूर्ती आर.एम. बापट यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन करण्यात आलेल्या समितीने महाराष्ट्रातील सुमारे 4  लाख 75 हजार कुटुंबांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक  सर्वेक्षण करण्यात आले व याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. यामध्ये शैक्षणिक व नोकरीविषयक 16 टक्के मराठ्यांना, तर मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केल्याने  विधानसभा निवडणुकीपूर्वी 9 जुलै  2014 रोजी तत्कालीन शासनाने  अध्यादेश काढला. मात्र या अध्यादेशावर हंगामी स्थगिती खंडपीठाने  दिली होती. ही स्थगिती तात्काळ हटवावी व विद्यमान  शासनाने 72 हजार नोकर्‍यांमध्ये फक्त मराठ्यांना 16 टक्के आरक्षण निश्‍चित करून हमी घ्यावी किंवा यापूर्वी  मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलेल्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करेपर्यंत या नोकरभरतीला स्थगिती  द्यावी, धनगर मुस्लिम समाजाला मागणीप्रमाणे आरक्षणाचा लाभ द्यावा, अण्णासाहेब पाटील  आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक निधीची तरतूद करावी, सरसकट  कर्जमाफी करावी, खरीप हंगामाचा विमा सरसकट मिळावा, शेतमालाला हमीभाव मिळावा, संभाजी महाराजांना बदनाम करत बेताल वक्तव्य करणार्‍या मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला भरावा आदी मागण्यांचे निवेदन या मोर्चेकर्‍यांनी तहसीलदार संजय पवार याना दिले.

 यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश देवरे, प्रकाश वाघमारे, अभिजित चौधरी  यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.  यावेळी गौरी डौले, राजेश्‍वरी जगदाळे, श्‍वेता उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. 
याप्रसंगी ज्ञानेश्‍वरी चिवटे, साक्षी मोरे, आदिती कदम, साक्षी साळुंखे, प्रीती जाधव, जिया बलदोटा,सदिच्छा शेळके आदींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी आर्या गुणवरे,आनंदी गुणवरे, शिवम मोरे, तुषार गुणवरे आदींनी पारंपरिक वेशभूषेत मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. 

मराठ्यांचा एल्गार ‘न भुतो न भविष्यती...’
या मोर्चामध्ये सुमारे दहा हजार सकल मराठा समाजाची उपस्थिती होती. शालेय मुलांनी व विद्यार्थ्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात आरक्षण व विविध मागण्यांचे फलक हातात घेत सहभाग घेतला.  सर्वच जाती-जमातीचे विशेषता मुस्लिम, दलित व धनगर  समाजबाधंवांची संख्याही या मोर्चामध्ये लक्षणीय होती.

मोर्चा व सोलापूर जिल्हा बंदमुळे करमाळ्यात एकही एसटी बस सुटली नाही व आगारातही आली नाही. खासगी वाहतुकीचा वापर करून ग्रामीण भागातील लोक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आठवड्यात दोन वेळा शहर व तालुक्यातुन उस्फूर्तपणे नागरिकांनी बंद ठेऊन आंदोलन करून शासनाचा निषेध केला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून चक्क मराठा क्रांती मोर्चातर्फे व्यवहार सुरळीत ठेवण्याचे आवाहन व्यापारी व नागरिकांना करण्यात आले होते. तरीसुद्धा हजारोंच्या संख्येने तिरडी मोर्चा निघाला. 

संपूर्ण मोर्चादरम्यान प्रतिकात्मक तिरडी मोर्चामध्ये चक्क पारंपरिक  डफडे वाजवत खांदेकरीसमोर शासनाची अंत्ययात्रा विधीवत काढण्यात आली व तहसील कार्यालयासमोर त्याचे दहन करण्यात आले. 
शासन धोरणाच्या निषेधार्थ दोन आंदोलकांनी प्रतिकात्मक केस काढून मुंडण केले.