Mon, Aug 19, 2019 18:17होमपेज › Solapur › असंख्य शाळा आयसीटी लॅबच्या प्रतीक्षेत

असंख्य शाळा आयसीटी लॅबच्या प्रतीक्षेत

Published On: Feb 28 2018 11:20PM | Last Updated: Feb 28 2018 10:53PMबार्शी : गणेश गोडसे

राज्यभरात असंख्य शाळा आय.सी.टी. लॅबच्या सुविधेपासून वंचित राहिलेल्या असून यामुळे संबंधित वंचित शाळेमधील हजारो विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून उर्वरित शाळेपैकी काही शाळांना आयसीटी लॅब मंजूर करण्यात आले आहेत.

त्याची निविदा प्रक्रिया रखडलेली असल्याचे सांगितले जाते. तरी संबंधित विभागाच्या वतीने रखडलेली निविदा प्रक्रिया त्वरित कार्यान्वित करून लॅब निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. संगणक लॅब  उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळण्यास सुरूवात होणार असून ते संगणक साक्षर होण्यासाठी हातभार लागणार आहे. 

शासनाच्या वतीने गत चार वर्षांपूर्वीपासून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत (आर.एम.एस.ए.) प्रत्येक माध्यमिक शाळेत सर्व सुविधायुक्‍त अशा अत्याधुनिक आयसीटी लॅबच्या आधारे शिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आयसीटी लॅबच्या संदर्भात शासनाच्या वतीने एकूण पाच टप्प्यांची निर्मिती करण्यात आली होती. या नियोजित पाच टप्प्यांपैकी दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील लॅब सुरळितपणे सुरू आहेत. 

आयसीटी उपक्रमांतर्गत मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि शासकीय माध्यमिक शाळेत संगणक प्रणाली प्रयोगशाळा मराठी स्थापन करणे हा खरा उद्देश या योजनेचा आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून 75.25% अनुदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या अनुदानामधून प्रत्येक माध्यमिक  शाळेला 12 संगणक संच, 13 टेबल, 25 खुर्च्या, 1 प्रोजेक्टर, 1 जनरेटर, संगणक शिक्षक याबरोबरच लाईट फिंटींग, रूम मॅटींग, फॅन, वीजबिल व इंटरनेट सुविधा पुरवल्या जातात. 

संबंधित संगणक लॅबसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी  (माध्यमिक) यांच्या माध्यमातून शिक्षण संचालकांना अर्ज सादर करावे लागतात. अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्याबरोबरच संगणक साक्षरता वाढविणे हाही याचा मुख्य उद्देश आहे. 

माहिती व आधुनिक डिजिटल युगाची ओळख व्हावी, हा सुद्धा हेतू समोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र  अनेक शाळाच अद्यापही या संगणक लॅबसाठी प्रतिक्षेत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण देण्यासाठी तातडीने वंचित शाळांना संगणक लॅब उपलब्ध करून द्यावेत, अशी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची मागणी आहे.