होमपेज › Solapur › कारखानदारांनी एफआरपी रक्कम त्वरित देण्याची मागणी 

कारखानदारांनी एफआरपी रक्कम त्वरित देण्याची मागणी 

Published On: Aug 07 2018 1:02AM | Last Updated: Aug 06 2018 9:02PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शिवसेना पदाधिकार्‍यांनी  ठिय्या आंदोलन केल्याने एकच गोंधळ उडाला होता. सोलापूर जिल्ह्यातील 21 साखर कारखानदारांनी  शेतकर्‍यांची 187 कोटींची एफआरपीची रक्कम अदा न केल्याने बळीराजा अडचणीत येऊ लागला आहे. शेतकर्‍यांची ही थकीत रक्कम त्वरित अदा न केल्यास शिवसेना व संभाजी आरमार उग्र आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे.
नुकतेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती या गावातील सिध्दाराम पाटील या शेतकर्‍याने सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखाना एफआरपीची रक्कम त्वरित अदा करत नसल्याने कर्जबाजारीमुळे  राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्या शेतकर्‍याने  चिठ्ठी लिहिल्यामुळे  खरी परिस्थिती समोर आली.

सोमवारी सकाळी संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात निवेदन दिले. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काची रक्कम अदा केली नाही. 21 साखर कारखाने मिळून 187 कोटी रुपये इतकी थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, राहुल यमगर, निलेश देवकते, प्रमोद जगताप, संताजी जांभळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सोमवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. सिध्देश्‍वर सहकारी सहकारी साखर कारखाना व बार्शीतील आयर्न शुगर या दोन साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांची एकूण 21 कोटी रुपयांची रक्कम देणे आहे.

मुस्ती गावातील शेतकर्‍याने दीड लाखाच्या कर्जापोटी आत्महत्या केली आहे, असे निवेदनात नमूद करुन साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना 15 ऑगस्टपर्यंत देण्याची मागणी केली आहे. यावेळी शिवसेनेचे लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, सदानंद येलुरे, गंगाराम हणमंतु चौगुले, वजीर शेख, बालाजी जगताप, रामा गवळी, प्रताप गरड, लक्ष्मण गरड,  गणेश कोठावळे, चंद्रकांत जगताप, अमोल मोरे, सुनील बागवे, अमोल काकडे उपस्थित होते.