Mon, Mar 25, 2019 13:17होमपेज › Solapur › मनोरमा साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर

मनोरमा साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 15 2017 10:01PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

मनोरमा साहित्य मंडळी व मनोरमा साहित्य परिषद शाखा सोलापूर यांच्या संयुक्‍तवतीने दहा साहित्यिकांना मनोरमा पुरस्कार जाहीर करण्यात येत असून 25 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सोलापुरातील रंगभवन सभागृहात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात येत असल्याची माहिती साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष द.ता. भोसले यांनी दिली. 
मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी कोटणीसनगर येथील मनोरमा बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यंदाच्या राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 

कोल्हापूर येथील इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना त्यांच्या ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ या पुस्तकासाठी मनोरमा बँकेचा 21 हजार रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार यावेळी जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथील अच्युत गोडबोले यांना त्यांच्या ‘मुसाफिर’ व पुणे येथील भानू काळे यांच्या ‘अंगारवाटा’ या साहित्यासाठी 21 हजार रुपयांचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. 
मारुती कटकधोंड यांच्या ‘कुंपण वेदनांचे, उन्हे परतून गेल्यावर’ व स्नेहा शिनखेडे यांच्या ‘काळजातले दिवे, तिनेच गगन झेलियले, आनंदाचा कंद’ या साहित्यासाठी कविता बँक साहित्य दहा हजार रुपयांचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. 

भरतकुमार मोरे यांच्या ‘व्यक्‍त मी व कविता मानवतेच्या’  व रेणुका महागावकर यांच्या ‘तुझ्यासाठी, सुजान पालकत्त्व’ या साहित्याकरिता मनोरमा मल्टिस्टेटचा दहा हजार रुपयांचा पुरस्कार विभागून देण्यात येत आहे. स.रा. मोरे ग्रंथालयाच्यावतीने देण्यात येणार्‍या दहा हजार रुपयांचा पुरस्कार योगीराज वाघमारे यांच्या समग्र साहित्यास व नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या साहित्यास जाहीर करण्यात आला आहे. कै. नागेशराव सुरवसे साहित्य व पत्रकार पुरस्कारासाठी पत्रकार उज्ज्वलकुमार माने व अकुंश गाजरे यांना पाच हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येत आहे. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी देण्यात येणार्‍या स.रा. मोरे ग्रंथालयाचा पाच हजार रुपयांचा पुरस्कार राजहंस प्रकाशन पुणे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला  अस्मिता गायकवाड, राजशेखर शिंदे, डॉ. महादेव देशमुख, प्रा. माधव कुलकर्णी, राजेंद्र भोसले, डॉ. कविता मुरुमकर, राजेंद्र भोसले, संतोष सुरवसे  आदी उपस्थित होते.