Sun, Aug 25, 2019 12:18होमपेज › Solapur › पाणीपुरवठा योजनेवर सरकारची वक्रदृष्टी

पाणीपुरवठा योजनेवर सरकारची वक्रदृष्टी

Published On: Apr 17 2018 10:33PM | Last Updated: Apr 17 2018 9:58PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी 

गेल्या वर्षी ऐन उन्हाळ्यात दक्षिण भागातील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. वास्तविक या योजनेची मुदत  डिसेंबर 16 मध्ये संपली होती. यावर निधीची उपलब्धता नसल्याने मुदत वाढ देण्यात आली होती. यावर ठेकेदारानी मार्च 2017 पर्यंत या योजनेतील पहिल्या अकरा गावांना पाणी उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले होते.

भीमा नदीच्या उचेठाण बंधार्‍यातून पाइपद्वारे पाणी उचलून ते जुनोनी येथे जलशुध्दीकरण केंद्र करुन ते सोळा गावातील उंच साठवण  टाक्या उभारणे चेन लिंक फेंसिंग पूर्ण पाईपलाईन निवासस्थान विद्युत संयोजन या कामी शासनाने 65 कोटी 29 लाख 64 हजार रु. इतका निधी मंजूर केला आहे. यात निविदा 37 कोटी 71 लाखांची आहे. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग 53 किमीसाठी आवश्यक लोखंडी पाईप पुरवली आहे. ज्याची किंमत 19 कोटी आहे. यात उचेठाण ते जुनोनी जलशुद्धीकरण केंद्रसाठी 32 कि.मी. तर जलशुद्धीकरण केंद्र ते रड्डे चे संतुलन टाकी साठी 7 कि.मी .आणि रड्डे ते भुयार संतुलन टाकीसाठी 17 कि.मी. पाईपलाईन चा समावेश आहे. याशिवाय विद्युत पुरवठासाठी 26 लाख जमीन खरेदी 8 लाख रुपये रस्ता क्रॉसिंगसाठी 15 लाख असे एकूण 49 लाख खर्ची आहेत. या शिवाय योजनेच्या  9 टक्के रक्कम इटीपी साठी खर्ची गेली आहे.

 यातील युती शासनाने चार वर्षात चार टप्प्यांमध्ये अनुक्रमे 13.50 कोटी, 6.15 कोटी, 6. 70 कोटी आणि 35 लाख असे एकूण 26 कोटी 70 लाख रुपये निधी दिला आहे. अजूनही 11 कोटी रुपये सरकारतर्फे मिळायचे आहेत.

 काँग्रेस आघाडी सरकारचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व  आ. भारत भालके यांचे सलोख्याचे संबंध असल्याचा फायदा योजनेच्या मंजुरीसाठी झाला. मात्र त्यानंतर सत्तांतर झाले  भाजप-सेना सरकार आले. गेल्या साडे तीन वर्षात या योजनेला 2 वर्षात सर्व निधी द्यायला हवा होता. मात्र अद्यापही या योजनेचे 11 कोटी रुपये सरकार देणे आहे.वास्तविक पाहता, ही योजना ज्या गावांना लाभदायी ठरणार आहे.

 भाजपचे सहयोगी सदस्य आ. प्रशांत परिचारक  यांनी या प्रश्‍नी लक्ष घालून अर्धवट योजनेस निधी मिळविण्यासाठी  प्रयत्न करायला पाहिजे होते असे या भागातील नागरिकांतून बोलले जात आहे.आ. परिचारक हे मुख्यमंत्र्यांचे  विश्‍वासू समजले जातात.  त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांतून ही योजना लवकर निधी मिळून पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  मात्र परिचारकांकडून यासंदर्भात कसलेही प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही.  विधानसभा अधिवेशनामध्ये आ. भारत भालके यांनी या योजनेच्या निधीसाठी  सरकारला जाब विचारत आहेत.

अजूनही या योजनेसाठी 11 कोटी रुपयांची गरज असून सरकार संवेदनशील असेल तर तातडीने या योजनेस निधी मंजूर करून या भागाला दिलासा देऊ शकेल.  अद्याप भुयार झोन च्या 8 कि.मी. पाईप लाईनचे काम अपूर्ण आहे.  काम सुरू असले तरी ते अतिशय कूर्म गतीने आहे. एकूणात पाहता भुयार झोन च्या 12 गावांना या उन्हाळ्यात पाणी मिळणे जवळपास अशक्य आहे. म्हणजे ही योजना पंचवार्षिक ठरते की काय असे चित्र दिसत आहे. अजूनही  बहुतांश कामे पूर्ण नाहीत. कर्मचारी निवासस्थान बांधले नाही,  रंगरंगोटी, किरकोळ दोष दुरुस्त्या, साठवण टाक्या, पंपिंग व्यवस्था ही कामे अपूर्ण आहेत.