Sun, Mar 24, 2019 04:10होमपेज › Solapur › खासदार साहेब आहात कुठे ?

खासदार साहेब आहात कुठे ?

Published On: Jul 06 2018 10:13PM | Last Updated: Jul 06 2018 9:58PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

 राईनपाडा ( ता. साक्री, जि.धुळे  )  येथे  मंगळवेढा तालुक्यातील चौघांना शेकडोंच्या जमावाने ठेचून मारले. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. देशभरात या घटनेविषयी दुख:द प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. मात्र  याच मतदारसंघाचे खासदार असलेले अ‍ॅड. शरद बनसोडे घटनेच्या 5 दिवसांनंतरही साधे सांत्वन करण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील जनता खासदारसाहेब कुठे आहात असा जाब विचारत आहे.

मंगळवेढा तालुक्याचा समावेश सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत आहे आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अ‍ॅड. शरद बनसोडे करीत आहेत. विशेष म्हणजे आपला मतदारसंघात सतत संपर्क असतो असा दावा करणारे खा. बनसोडे माणूसकीला काळीमा फासणार्‍या या अमानूष घटनेला पाच दिवस झाले तरीही खवे आणि मानेवाडी येथील मयतांच्या भेटीला आलेले नाहीत.   घटनेचे गांभीर्य ओळखून आ. भारत भालके येथे 3 दिवस तळ ठोकून होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. प्रशांत परिचारक, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी समयसूचकता दाखवत  मयतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत तात्काळ मुख्यमंत्र्यांना फोन करून, पत्र लिहून मदत देण्याबद्दल आश्‍वस्त केले. 

भारिपचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर हे देखील तिसर्‍या दिवशी मंगळवेढ्यात आले. शनिवार  दि. 7 जुलै रोजी केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले या कुटुंबीयांच्या भेटीसाठी येत आहेत. 
मात्र ज्या लोकसभा मतदार संघातून दोन लाखाच्या मताधिक्याने भाजप खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे निवडून आले. त्या मतदार संघात असलेल्या खवे मानेवाडी गावातील मतदारासोबत घडलेल्या घटनेच्या बाबत हे खासदार कोणत्या व्यस्त कामामुळे सांत्वनासाठी आले नाहीत असा प्रश्‍न जिल्ह्यातील नागरिकांना  पडला आहे.