Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Solapur › साडे तीन वर्षांत केवळ ११ गावांत पोहोचले पाणी

साडे तीन वर्षांत केवळ ११ गावांत पोहोचले पाणी

Published On: Apr 16 2018 10:57PM | Last Updated: Apr 16 2018 10:17PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी 

तालुक्यातील 39 गावांसाठी पाणीपुरवठा योजनेच्या कामास साडे तीन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. मात्र साडे तीन वर्षानंतर केवळ 11 गावांत पाणी पोहोचले आहे. अद्यापही 28 गावांना पाण्याची प्रतीक्षा आहे. यावरून 28 गावांना पाणी देण्यास 10 वर्षे लागतील का असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. 

15 मे 2017 रोजी  भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील गोणेवाडी झोन  मधील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन  आ. भारत भालके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी 28 गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप बाकी असून तेही लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना आ. भालके यांनी उपस्थितीत असलेल्या जनसमुदायासमोर संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना दिल्या होत्या. मात्र आता या उद्घाटन सोहळ्यास वर्ष पूर्ती होत आली असूनदेखील अद्याप भुयार झोन पूर्णपणे शिल्लक आहे. या झोनमध्ये असणार्‍या 11 गावांना या उन्हाळ्यात पाणी मिळण्याची शाश्‍वती वाटत नाही तर नंदेश्‍वर झोनमधील भाळवणी, खवे, पडोळकरवाडी या गावांसाठी देखील हा उन्हाळा भयावह असणारा आहे. 

निसर्गाच्या अवकृपेमुळे कायम दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या गावांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असता. परंतु गेल्या वर्षभरात देखील ही योजना पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर निर्माण झाला आहे. 

   योजनेच्या पहिल्या टप्प्यात सूरू झालेल्या गोणेवाडी झोनमधील पाठखळ, खुपसंगी, लेंडवे चिंचाळे, गोणेवाड़ी, शिरसी, डोंगरगांव, जुनोनी, मेटकरवाडी, खड़की, हाजापूर, हिवरगाव या गावातून देखील   पूर्वीच्या चालू जुन्या योजनामधील साठवण टाक्या  ग्रामस्थांच्या मागणीनुसार भरून दिल्या जात आहेत. तर नादेश्‍वर झोनमधील भाळवणी, खवे, पडोळकरवाडी या गावांना जाणार्‍या पाईपलाईनच्या कामात अडथळे आहेत. त्यात जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पाईपलाईन गळती झाली आहे. ते शोधून टेस्टिंग करायची कामे अजूनही सुरूच आहेत. एकूण 16 उंच साठवण पाण्याच्या टाक्या या योजनेत बांधायचा आहेत. यातील 15 टाक्यांची व्यवस्था झाली आहे. त्यात खुपसगी, शिरसी, हाजापूर, नंदेश्‍वर,   सिद्धनकेरी,  मानेवाडी, महमदाबाद ,लोणार या 8 गावच्या पाण्याच्या टाक्या भरल्या आहेत. त्याची चाचणी झाली आहे तर खवे, पौट, मारळी, येळगी, शिवनगी या पाच गावांत टाक्यांची स्थिती अपूर्ण आहे. मेटकरवाडी, हिवरंगाव या गावातील पाण्याच्या टाकीचे काम वगळले आहे. पडोळकरवाडी येथे असणार्‍या उंच साठवण पाण्याचा टाकीचे काम वाळूच्या अभावी अर्धवट स्थितीत थांबले आहे. 

6 डिसेंबर 2014  ला  या योजनेचा शुभारभ झाला आहे.तब्बल अडीच वर्षानंतर  योजनेतील एका झोनचे पाणी सुरू झाले  तरीही अन्य ठिकाणचे काम पूर्ण झाले नाही. योजनेतील अन्य गावांची कामे सध्या निधी अभावी रखड चालली असून या योजनेची मुदत संपून गेली आहे.