Thu, Jul 18, 2019 12:46होमपेज › Solapur › शोकाकूल वातावरणात चौघांवर अंत्यसंस्कार

शोकाकूल वातावरणात चौघांवर अंत्यसंस्कार

Published On: Jul 03 2018 10:52PM | Last Updated: Jul 03 2018 10:41PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील हत्यांकांडात मृत्युमुखी पडलेल्या दादाराव भोसले, भारत माळवे, भारत भोसले आणि अप्पा इंगोले या चौघांच्याही मृतदेहांवर अतिशय शोकाकूल वातावरणात मंगळवारी सकाळी 10 वाजता खवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. खवे गावावर शोककळा पसरली असून तालुक्याच्या विविध भागांतील हजारो लोक या अंत्यविधीस उपस्थित होते. मृतांच्या कुटुंबांतील  महिला, मुलांचा हंबरडा ऐकून यावेळी उपस्थित हजारो नागरिकांचेही डोळे पाणावले. 

दरम्यान, मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या मंगळवेढा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, संपूर्ण शहरात स्मशान शांतता पसरली होती. तालुक्याच्या ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला. तालुक्यातील कचरेवाडी, शेलेवाडी, गणेशवाडी, पाठखळ, खुपसंगी, जुनोनी, नंदेश्‍वर, महमदाबाद हु., मानेवाडी, हुन्नुर, लवंगी, निंबोणी, खवे, जित्ती, शिरनांदगी, रेवेवाडी या गावाशिवाय राज्यातील कानाकोपर्‍यात असलेला समाज बांधवानी खवे गावाकडे धाव घेतली,

तत्पूर्वी धुळे येथून आणलेले चारही मृतदेह मंगळवारी सकाळी 7 वाजता त्यांच्या गावी दाखल झाले. नातेवाईकांतून मारेकर्‍यांबद्दल संताप व आक्रोश पहायला मिळत होता. समाजातील काही शिक्षित नागरिकांकडून या प्रकरणात राहईनपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पोलिस पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, मृतांच्या वारसांना योग्यतेप्रमाणे नोकरी द्यावी व इतर मागण्या याबाबत लेखी पत्र दिल्याशिवाय खवे व मानेवाडीतील मृतांचा अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांना घेतला. 
यावेळी  उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मृत कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी  10 लाख रुपये तत्काळ आर्थिक मदत आणि घरातील वारसास शासकीय नोकरी देण्याचे लेखी पत्र लिहून दिल्यानंतर  उपस्थित नातेवाईकांचा आक्रोश थांबला व अंत्यविधी संपन्न झाला. मानेवाडी येथे ही अप्पा इंगोले या युवकावर अंत्यसंस्कार  करण्यात आले.

याप्रसंगी आ. भारत भालके यांच्यासह उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे,  प्रांताधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे सभापती प्रदीप खांडेकर, बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, शिवसेना तालुकाध्यक्ष  प्रा.येताळा भगत, सचिन शिवशरण, मच्छिंद्र भोसले, गोरख इंगोले, अन्य समाज बांधवासह हजारो नागरिक खवे येथे उपस्थित होते. दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ  मंगळवारी मंगळवेढा बंदची हाक दिली होती. या बंदला मंगळवेढेकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मंगळवेढा पूर्णपणे बंद झाले आहे .शिवाय ग्रामीण भागात ही बंद पाळण्यात आला. शहरातील मोठे व्यापारी, लहान व्यावसायिक, छोटे दुकानदार, हातगाडे आदी व्यावसायिकानी आपली दुकाने उत्स्फूर्त बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. बस स्थानक  परिसर, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारही बंद होते. शहरात जागो जागी पोलिस बंदोबस्त असून बंदमुळे शहरात  शुकशुकाट पसरला आहे.