होमपेज › Solapur › ‘त्या’ मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी

‘त्या’ मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी

Published On: Jul 03 2018 10:52PM | Last Updated: Jul 03 2018 10:24PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

डवरी समाजातील 5 लोकांना अमानुषपणे ठेचून मारहाण करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी उद्वेगपूर्ण भावना  मंगळवेढेकरांनी शोकसभेत व्यक्त केली. या शोकसभेला आ. भारत भालके, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहूल शहा, नगराध्यक्ष अरूणा माळी यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. 

 तालुक्यातील 5 नागरिकांच्या धुळे जिल्ह्यात झालेल्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील मारुतीच्या   पटांगणात  सर्वपक्षीय शोक सभा आयोजित केली होती.  यावेळी  बोलताना आ. भारत भालके  म्हणाले की, राईनपाडा येथे 5 जणांची हत्या करून तेथील  लोकांनी माणुसकीला  काळिमा फासण्याचे काम केले आहे.  आदिमानाव काळात सुद्धा अशा पध्दतीने मारहाण करीत नसतील. आज तर 21 व्या शतकातील माणसे कशी वागतात याचे ज्वलंत उदाहरण आहे. उद्यापासून पावसाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे. सभागृहात स्थगन प्रस्ताव देऊन सदर आरोपींना कठोर कारवाई करून त्यांच्या कुटुंबाला  न्याय देण्याचे काम पार पाडणार आहे. 

माजी मंत्री  प्रा. ढोबळे यांनी , मारेकर्‍याना  जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. याकरता उज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि हा  खटला जलदगती न्यायलायात चालवावा. हा समाज भिक्षु आहे त्यांना आता स्थिर होण्यासाठी  शासकीय स्तरावर जमीनी द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

या प्रसंगी राहुल शहा, नगराध्यक्षा अरुणा माळी, अनिता नागणे, लतीफ तांबोळी, नारायण गोवे, अ‍ॅड़. भारत पवार, अविनाश शिंदे यांनीही श्रद्धांजली वाहिली. शोक सभेच्या शेवटी सर्वांनी  2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. या शोकसभेस नगरपालिकेतील पक्षनेते अजित जगताप, चंद्रकांत घुले,  शुभांगी सुर्यवंशी, भारत पाटील, नारायण गोवे, अ‍ॅड़. रमेश जोशी, सोमनाथ माळी, भारत बेदरे, भारत पवार, तानाजी खरात, प्रकाश वणगे, दिलीप जाधव, रामभाऊ वाकडे, प्रविण खवतोडे, बशीर बागवान, रशीद तांबोळी, बिलाल बागवान, दत्तात्रय भोसले, रावसाहेब फटे, अशोक माने, बाबा कोंडूभैरी, साहेबराव शिंदे, महादेव दिवटे आदी  उपस्थित होते.