Sat, Jul 20, 2019 12:56होमपेज › Solapur › मंगळवेढा न. पा. च्या सभेत खडाजंगी

मंगळवेढा न. पा. च्या सभेत खडाजंगी

Published On: Jun 22 2018 2:04AM | Last Updated: Jun 21 2018 10:51PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

नगरपालिकेच्या  विकास कामात ठेकेदाराने बनावट कागदपत्रे देऊन पालिकेचे 41 लाख रूपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेऊन त्यास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या सभेत 4 कोटी रूपयांच्या विकास कामांनाही मंजूरी देण्यात आली.  या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अरुणा माळी होत्या.

गुरूवारी झालेल्या पालिकेच्या सभेत संत चोखामेळा समाधीचे संरक्षण, आणि विकास या महत्वाच्या ठरावा सोबत हिन्दू मुस्लिम लिंगायत आणि दलित समाजाच्या स्मशानभुमी विकसित करण्याच्या विषयासह एकूण चोवीस विषयास मंजूरी देण्यात आली . या सभेत चार कोटी रूपयांच्या विविध विकास कामाना मंजूरी देण्यात आली.

 कामास केलेल्या विलंबाबद्दल ठेकेदार प्रतिक किल्लेदार यांनी बनावट कागदपत्रे देवून पालिकेची फसवणूक केल्याबद्दल काळ्या यादीत टाकण्यावर पक्षनेते व नगरसेविकांनी जोर धरला. त्यांच्यावर आठ दिवसात कारवाईचा प्रस्ताव न दिल्यास नगरअभियंता व मुख्याधिकारी यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव देण्याचा ठरावही मंजूर झाला.

जिजामाता व्यापारी संकुलातील काम करण्याचा  ठेक्यातील कालावधी संपल्याने 15 महिने जादा झाल्याने या गाळ्यातील भाड्यापोटी 11 लाख व कामातील विलंब दंड 23 लाखाचे पालिकेचे नुकसान झाले. नगरपालिकेची पाणी व्यवस्था वापरत 6 लाख रू. पाणीभाड़े ठेकेदाराने थकवले असून याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी करण्यात आला. कामातील विलंबाबत ठेकेदारास नोटीस दिली नसल्याचे समोर आले आहे. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना, नागरी दलित्तेर वस्ती सुधारणा योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान, दलित वस्ती पाणी योजना मधून चालू वर्षी कामे घेणे, रमाई आवास योजनेची अमंलबजवणी करणे आदीसह अन्य विषय मंगळवेढा नगरपालिकेच्या वार्षिक सभेत मंजूर करण्यात आले.

खून प्रकरणात आरोपी असलेले नगरसेवक पांडुरंग नायकवाडी आणि प्रशांत यादव  वार्षिक सभेला उपस्थित राहता यावे म्हणून त्यांनी न्यायलायात अर्ज केला होता. मात्र न्यायालयने तो अर्ज फेटाळला. 
उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, प्रविण खवतोडे, संकेत खटके, राहुल सावंजी, बशीर बागवान, अनिल बोदाड़े, अनीता नागणे, भागीरथी नागने, लक्ष्मी म्हेत्रे, राजश्री टाकणे, भाभी मकानदार, निर्मला माने, पारुबाई जाधव, रतन पडवळे आदींसह पाणी पुरवठा अभियंता चेतन माळी, बांधकाम अभियंता दिंगबर तोडकरी, लेखापाल राम पवार सह कर्मचारी उपस्थित होते.

नगराध्यक्षा आणि पक्षनेते यांच्यातच खडाजंगी

सभेच्या सुरुवातीलाच पक्षनेते अजित जगताप व नगराध्यक्षा अरूणा माळी यांच्यातच खडाजंगी झाली.  तीन महिने मासीक सभा घेतली नाही. पाच महीने झाले स्थायी ची सभा नाही. ठेकेदाराच्या हितासाठी पालिकेच्या वापर  केला जात असल्याचे मुद्दे अजित जगताप यांनी उपस्थित केले.