Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Solapur › सोड्डीत दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

सोड्डीत दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

Published On: Feb 09 2018 10:55PM | Last Updated: Feb 09 2018 10:22PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी 

 तालुक्याच्या दक्षिण भागातील सोड्डी गावात गुरुवारी मध्यरात्री बारानंतरच्या सुमारास चार घरांवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. त्यात कस्तुराबाई रामण्णा बिराजदार (वय 65) या महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर  मलकाप्पा रेवगोंडा बिराजदार (वय 65) यांना गंभीर जखमी करण्यात आले. यात एकूण 15 हजार रुपये किमतीचा अर्धा तोळ्याचा सोन्याचा ऐवज चोरीस गेला आहे. 

गुरुवारी रात्री 10 नंतर शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सोड्डी येथे हा दरोडा टाकण्यात आला आहे. यात कस्तुराबाई बिराजदार या  शिवलिंगप्पा बिराजदार यांच्या घरी झोपले असताना या घरात अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करीत घराच्या दरवाजाची कडी काढून आत गेल्यानंतर कस्तुराबाई बिराजदार यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिना ओढून काढत त्यांच्या छातीवर, पाठीवर डाव्या बाजूस हत्याराने वार करून हत्या केली. तसेच मलकप्पा रेवगुंडा बिराजदार यांना चोरट्यांनी जबर मारहाण केली. याशिवाय गावातील शिवक्का हिरेमठ, मुत्तवा नरूठे, आक्काव्वा पुजारी यांच्या घरी प्रवेश करून चोरी केली असून ते कर्नाटकच्या दिशेने फरार झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

जखमी मलकाप्पा बिराजदार यांना उपचारासाठी जतला नेण्यात आले आहे. चोरी प्रकरणाने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी सकाळी जिल्हा पोलिसप्रमुख वीरेश प्रभू, अतिरिक्त पोलिसप्रमुख  मिलिंद मोहिते, उपविभागीय  पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली. 

यावेळी श्‍वानपथकाकडून परिसरातील ठिकाणी चाचपणी करण्यात आली. यावेळी गावालगतच्या स्मशानभूमिकडे दिशा मिळाली असून मृत कस्तुराबाई बिराजदार यांचे दुपारी मरवडे येथे शवविच्छेदन करण्यात आले. अज्ञात दरोडेखोरां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची फिर्याद त्याां मुलगा सिधराया बिराजदार यांनी दिली आहे 

या गावातील बहुसंख्य लोक  उपजीविका करण्यासाठी सांगली व कोल्हापूर भागात ऊसतोडणीसाठी गेले आहेत. गावात वयोवृद्ध महिला आहेत. हे गाव कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने दरोडेखोरांना चोरी करून कर्नाटकाचा आसरा घेणे शक्य होते. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.