Tue, Jul 23, 2019 19:27होमपेज › Solapur › नंदूर पाणी योजना : शासकीय मालमत्तेचे वस्त्रहरण सुरू

नंदूर पाणी योजना : शासकीय मालमत्तेचे वस्त्रहरण सुरू

Published On: Apr 19 2018 9:57PM | Last Updated: Apr 19 2018 9:03PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी 

तालुक्याच्या पूर्व भागात असणार्‍या नंदूरसह इतर दहा गावांसाठी असलेल्या नंदूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला या भागातील गावाकडून पाण्याची मागणी नसल्याने कुलूप लागले आहे. आणि यामुळेच या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत असणार्‍या इमारतीला कुणी वाली उरला नसल्याने मालमत्तेचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे लाखो रुपये किंमतीच्या शासकीय मालमत्तेचे वस्त्रहरण राजरोसपणे सुरू आहे. 

नंदूरपासून एक किलोमीटर अंतरावर प्रादेशिक पाणीपुरठा योजनेचे केंद्र आहे. सध्या या ठीकाणी एकही कर्मचारी, सुरक्षा रक्षक नसल्याने कोड्ययवधी रुपयाची  मालमत्ता बेवारस स्थितीत आहे. लाखो रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. शिवाय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी ट्रान्सफार्मर डी.पी. असे साहित्यदेखील काढून नेले आहे. लाभक्षेत्रातील ग्रामंपचायतींकडून पाण्याची मागणी नसल्यामुळे गेल्या  अडीच वर्षांपासून ही योजना बंद आहे. त्यामुळे इथल्या इमारती आणि साहित्याची मोठी मोडतोड झाली आहे. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने आत सहज प्रवेश करता येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नाही. तर जिल्हा परिषदही हात झटकत आहे. सध्यस्थितीला या भागातील गावांना या योजनेची उपयुक्तता वाटत नसली तर भविष्यात पाणी आवश्यक वाटल्यास ही योजना  कार्यान्वित करावी लागणार आहे. त्या वेळी मात्र धरण उशाला व कोरड घशाला म्हणायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. भाजप शिवसेना युती शासनाच्या काळात 1999 साली नंदूरसह  मरवडे , डोणज , तळसंगी, भालेवाडी बालाजी नगर , कागष्ट, येड्राव, कात्राळ , डिकसळ या अकरा गावांचा कायमचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेवर शासनाचे सुमारे दहा कोटी रुपये खर्ची पडले आहेत. मात्र तरीही  योजनेची चार ते पाच गावात अनेक कामे अपूर्ण आहेत. तळसंगी व फटेवाडी येथील पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट आहे. या योजनेचा सन 2015 साली मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर पाँईट म्हणून उपयोग होत होता. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून ही लयलूट बंद करण्याची मागणी अकरा गावांतील नागरिकांमधून होत आहे .