Fri, May 24, 2019 08:55होमपेज › Solapur › धरणग्रस्तांच्या जमिनींची बेकायदेशीर विक्री

धरणग्रस्तांच्या जमिनींची बेकायदेशीर विक्री

Published On: Jul 26 2018 11:04PM | Last Updated: Jul 26 2018 10:28PMमंगळवेढा : प्रा. सचिन इंगळे

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी त्यांच्या परस्पर कायदा धाब्यावर बसवून साम, दाम, दंड, भेदनीती वापरून खरेदी-विक्रीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात उघडकीस येत असून या जमीन गैरव्यवहारांमध्ये धरणग्रस्तांसह खरेदीदारांचीही फसवणूक होत असून एजंट मात्र मालामाल होत असल्याचे दिसून येते. 

 उजनी धरणाच्या निर्मितीत मंगळवेढ्याचे योगदान मोठे आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र कोयना परिसरातील धरणग्रस्तबाधितांना शासकीय आदेशाने तालुक्यातील शेतकर्‍यांनी काळी कसदार जमीन दिली. त्याचा मोबदला आजही काहीजणांनी स्वीकारला नाही, तर त्याकाळात अतिशय कमी मोबदला मिळाला. पण सगळीकडून अन्याय सहन करणारा हा तालुका गप्प राहिला. सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी उजनी धरणाच्या निर्मितीसाठी वापरल्या गेल्याने त्यांना मंगळवेढा परिसरातील जमिनी देण्यात आल्या. त्यात महार वतन देवस्थान इनाम वर्ग  2 च्या जमिनी दिल्या आहेत. गेल्या पंधरा वर्षांत  या जमिनीच्या मालकांनी एवढ्या दूरवर येऊन जमिनी कसणे शक्य नाही. शिवाय इथे मिळालेल्या जमिनींचा कब्जा पण सहसा स्थानिक शेतकरी मिळू देत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर मेढा, महाबळेश्‍वर, सातारा आदी परिसरांतील पुनर्वसन झालेल्या शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी विक्री करायला सुरुवात केली. यातच एजंट, दलालांची निर्मिती झाली. एवढ्या दूरवर असणार्‍या मालकाला शोधणे, कागदपत्रे जुळवाजुळव करणे, परवानग्या काढणे आदी किचकट प्रक्रिया करणे यासाठी विशिष्ट यंत्रणा कामाला लागली आणि या धंद्याला बरकत आली. दिवसागणिक वाढणार्‍या दराने गुंतवणुकीचा मोबदला वर्षभरात दुप्पट, पाचपट होऊ लागला. पात्रता नसताना काहीही कामधंदा न करता एवढी माया खिशात येऊ लागल्याने लिहितावाचता न येणारेही या गोरखधंद्यात शिरले. काहीजणांना खायचे वांदे होते ते आता लोकांना जेवणावळी झाडत आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांत अशा जमिनी विक्री व्यवहारांना मंदीने ब्रेक लागल्याने एजंट सैरभैर झाले आहेत. 

शासनाने परवानगी दिल्याने गेल्या दहा वर्षांत धरणग्रस्त पुनर्वसनसह अनेक जमिनींचे विक्रमी खरेदी-विक्री व्यवहार झाले. काही जमिनींची खरेदी-विक्री करता येत नाही, तर  बनावट शिक्के कागद स्वाक्षर्‍या करून या भागातील शेतकर्‍यांना जमिनी विकण्याचा सपाटा सुरु झाला. हे मोठे रॅकेट असून यात तालुक्यातील शेतकरी फसला जात आहे.

पुनर्वसनासाठी आरक्षित असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील जमिनींचे बनावट  वाटपपत्र  तयार  करून बोगस व्यक्तींनी जमीन हडप केल्याचे गैरप्रकार घडत आहेत. एजंट या सर्व प्रकाराला जबाबदार असून मंगळवेढा तहसील कार्यालयातील  कर्मचार्‍याला लक्ष्मी दर्शन घडवून  असे प्रकार होत असल्याचे समोर येत आहे.

 धरणग्रस्तांसाठी आरक्षित केलेली लाभक्षेत्रातील जमीन बनावट दाखल्यांद्वारे बोगस प्रकल्पग्रस्त समोर उभे करून त्याची अनेकांनी खरेदी केली आहे. बनावट दाखले तयार करणारे आणि त्याआधारे जमीन घेणार्‍या बोगस एजंटावर, खरेदीदार, साक्षीदार, दस्त लिहणारे व नोंद धरणारे सगळे सामिल असतात.  गेल्या  2 वर्षांत तर काही प्रकरणे अशी समोर आली आहेत. 

त्यात परस्पर जमीन विक्री करून मूळ जमीन मालकाच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून त्याचे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र बनावट बनवून जमिनी विकल्या आहेत. यामुळे प्रशासन आणि महसूलसह अशी ओळखपत्रनिर्मिती करून देणार्‍या यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. अशाप्रकारे संपूर्ण बनावटगिरी करायची, नंतर आपले कमिशन मिळवून गायब व्हायचे. ते प्रकरण न्यायालयात अडकवून पाडायचे, असा गोरखधंदा सुरु आहे. याबाबत जिल्हास्तरीय प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांकडून होत आहे.