Fri, Jul 19, 2019 05:05होमपेज › Solapur › उजनीच्या कालव्यात सापडले तरुणाचे मुंडके

उजनीच्या कालव्यात सापडले तरुणाचे मुंडके

Published On: Feb 03 2018 5:13PM | Last Updated: Feb 03 2018 5:13PMटेंभुर्णी : प्रतिनिधी
माढा तालुक्यातील वडोली गावाच्या हद्दीत उजनी कालव्याच्या पाण्यात टेंभुर्णी पोलिसांना  एका अज्ञात तरुणाचे मुंडके सडलेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी मिळून आले आहे. धड गायब असलेल्या तरुणाची ओळख पाठविण्याचे व त्याच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान टेंभुर्णी पोलिसांपुढे आहे.

शनिवारी सकाळी वडोली शिवारातील उजनी धरणाच्या कॅनॉलमधील पाण्यात माणसाचे फक्त डोके वाहत आले असल्याचे व ते एका काटेरी झाडात अडकल्याचे काही शेतकऱ्यांना दिसून आले. वडोली गावचे पोलिस पाटील धनाजी नामदेव काळे यांनी टेंभुर्णी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करून मुंडके ताब्यात घेतले.

या घटनेतील मृत इसम ३५ ते ४० वर्ष वयोगटातील असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला असून त्याचा चेहरा पूर्णपणे सडलेला असल्याने त्याची ओळख पटविणे अवघड बनले आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने त्याचे धड कोठेतरी टाकून दिले असावे व फक्त मुंडके कालव्यात फेकून दिले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेचा सपोनि राजेंद्र मगदूम हे अधिक तपास करीत आहेत.