Tue, May 21, 2019 04:05होमपेज › Solapur › मारहाणीचा बनाव रचल्याचे उघड

मारहाणीचा बनाव रचल्याचे उघड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी 

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिस गुन्हा दाखल करतील या शक्यतेने टेंभुर्णीतील तरुणाने चक्क पोलिसांवरच मारहाण केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. परंतु, पोलिस तपास आणि सीसीटीव्ही फुटेजआधारे चौकशी अधिकार्‍यांनी आरोप असलेल्या पोलिस कर्मचारी-अधिकारी यांना क्‍लिनचीट दिल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. 

संतोष ऊर्फ बापू हनुमंत बोडरे असे पोलिसांनी मारहाण केलेल्या तरुणाचे नाव होते.  टेंभुर्णीजवळील पुणे-सोलापूर महामार्गावर एस.टी. वाहकाला काहीजण मारहाण करत होते. यादरम्यान संतोष बोडरे हा तरुण मारहाणीचे फोटो काढत होता. याठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांशी बोडरे याने वाद घालत पोलिसांशी उद्धट वर्तवणूक केले होती. यामुळे संतापलेल्या पोलिसांनी बोडरे यास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मी रामोशी समाजाचा असल्यामुळे आपणास जबर मारहाण केली असल्याचा आरोप केला होता. या कृत्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या कृतीवर जोरदार टीका केली जात होती, तर यातील दोषींवर कारवाई करण्यासाठी रामोशी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. या  पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन नि:पक्ष चौकशी होण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि करमाळ्याचे उपविभागीय पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. या दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी तसेच प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. 

यामध्ये बोडरे यास कोणत्याही प्रकारच्या गंभीर जखमा झाल्या नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि केलेल्या आरोपामध्येही तथ्य आढळून आले नसल्याची खात्रिलायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बोडरे याने आपल्यावर  शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी होणारी कारवाई टाळण्यासाठी हा बनाव रचल्याचे या चौकशीतून उघड झाले आहे.असे खात्रीलायक पोलिस सूत्रांनी सांगितले.