माळीनगर : गोपाळ लावंड
माळशिरस परिसरात निवडणुकांच्या दिवसात राजकीय वातावरणाला उधान येत असते. या अशा उधानलेल्या वातावरणामध्ये ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे परिसराचे वातावरण ढवळून निघत असते. तालुक्यात मागील टप्प्यात ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या व सध्या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वातावरण तापले आहे. यामुळे चार गावात राजकीय मोर्चेबांधणीला वेग आल्यामुळे ऐन थंडीतही या गावांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
तालुक्यातील एका बाजुच्या माळीनगर , वाफेगाव तर दुसऱ्या बाजुचे धर्मपुरी ७ ४९ व कारूंडे या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. यामध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धर्मपुरी सरपंच पदासाठी ७ व सदस्यसाठी ५ प्रभागातून १३ जागासाठी ४९ अर्ज, कारूंडे सरपंच पदासाठी ५ व सदस्य ४ प्रभागातील ११ जागांसाठी २८ अर्ज, माळीनगरसाठी सरपंच पदासाठी १४ व सदस्य १० प्रभागातून १७ जागेसाठी ७३ अर्ज, तर वाफेगावसाठी सरपंच पदासाठी ८ व सदस्य ३ प्रभागातून ९ जागेसाठी ३१अर्ज दाखल झाले आहेत. सरपंचपदासाठी ४ जागांसाठी ३४ तर सदस्य पदासाठी १८१ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधीकारी तहसिलदार माने यांनी दिली. अव्वल कारकुण आर. बी. भंडारे, यू. यू. मोरे आदी उपस्थित होते.
५ ते ११ डिसेंबर नामानिर्देशन पत्र भरणे, १२ रोजी छाननी , १४ रोजी माघार, २६ डिसेंबर मतदान व २७ रोजी निकाल जाहीर होणार आहेत. १४ डिसेंबर रोजी चित्र स्पष्ट होणार आसले तरी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला असून गाव बैठका, आरोप प्रत्यारोप, विकासाचे प्रश्नांवर तर्क वितर्क काढले जात असून राजकीय वातावरण तापले आहे.