Tue, Sep 25, 2018 15:18



होमपेज › Solapur › मुदत ठेवीच्या पावतीची बँकेकडे नोंदच नाही, ग्राहक चिंतेत

मुदत ठेवीच्या पावतीची बँकेकडे नोंदच नाही, ग्राहक चिंतेत

Published On: Mar 14 2018 5:56PM | Last Updated: Mar 14 2018 5:56PM



माळीनगर  : वार्ताहर 

मुदत संपल्यावर व्याजासह होणारी रक्कम मागायला गेलेल्या ग्राहकाला त्याच्या मुदत ठेवीच्या पावतीची बँकेकडे नोंदच नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बँकेने आपल्याला फसविल्याची तक्रार करीत या ग्राहकाने बँकेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे बँकेतील ठेवींबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

माळीनगर (ता. माळशिरस) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार घडला आहे. सेंट्रल बॅक ऑफ इंडियाच्या माळीनगर शाखेत लवंग (ता. माळशिरस) येथील शेतकरी हनुमंत वसंत लोंढे यांना हा अनुभव आला आहे. श्री लोंढे यांनी ३ जानेवारी २०१६ रोजी या बँकेत ७.७५ टक्के व्याज दराने दोन वर्षासाठी ४५ हजार रूपये टर्म डिपॉजीट ठेवले होते. त्याची मुदत ३ जानेवारी २०१८ रोजी संपली आहे. मुदतीनंतर या शेतक-याला ५३ हजार ४०४ रूपये मिळणे अपेक्षित आहे. या संदर्भातील बँकेची ठेव पावती या शेतक-याकडे आहे. मुदत संपल्यापासून बँकेत आपली रक्कम मिळावी यासाठी ते हेलपाटे घालीत आहेत. मात्र तुमच्या पावतीची आमच्या दफ्तरी नोंदच नाही असे सांगून बँकेने हात झटकले आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या या शेतकरी ग्राहकाने शाखाधिका-यांना कायदेशिर नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून पाच दिवसात ही रक्क्म मिळावी. अन्यथा या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी व दिवानी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. 
दरम्यान सेंट्रल बँक ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीकृत बँकेतील ग्राहकाला आलेला हा अनुभव धक्कादायक आहे. अधिका-यानी दिलेली माहिती व श्री लोंढे यांना दिलेले पत्र पाहता असाच अनुभव अन्य काही ग्राहकांना देखील येण्याची शक्यता दिसत आहे.