होमपेज › Solapur › महाराष्ट्राच्या नकाशावर गाजतेय मळेगाव

महाराष्ट्राच्या नकाशावर गाजतेय मळेगाव

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 10:01PMबार्शी : गणेश गोडसे

गावातील लोकांच्या विचारात  एकवाक्यता व समाजहित साधण्याची विचारसरणी असल्यास गावाबरोबरच समाजाचाही विकास साधला जाऊ शकतो. त्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्नांची गरज  असते. हेच मळेगाव (ता. बार्शी) येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आपल्या एकजुटीमधून महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.

एखादे गाव  एखाद्या विषयात अथवा क्षेत्रात  अग्रेसर राहू शकते.आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकते. मात्र मळेगाव हे गाव मात्र याला अपवाद ठरत आहे. कारण  सध्या मळेगावचा विकासाचा डंका सर्वच क्षेत्रांत चांगल्या पद्धतीने गाजताना दिसत आहे. गावातील तंटे असो, पर्यावरण संतुलनाचा विषय असो अथवा दारूबंदी यासह डिजिटलमुक्‍त गाव विषय  असो अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रांत मळेगावने आपला ठसा उमटवलेला आहे, हे वारंवार दिसून येत आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित मळेगाव जलयुक्‍तमध्ये आदर्शवत ठरले आहे. 

बिनविरोध ग्रामपंचायतीची परंपरा ः  सलग 45 वर्षे गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा विडा उचलून ग्रामस्थांनी तो लिलया पेलला आहे. अटीतटीचा व ग्रामीण जनतेच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा विषय ठरत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसारख्या विषयातसुद्धा मळेगाव ग्रामस्थांनी वारंवार आपल्यामधील एकीचे दर्शन दाखवत गाव सलग 45 वर्षे म्हणजेच अखंडित नऊवेळा झालेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून दाखवलेली आहे. ही बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची बाब महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने खरोखरच मार्गदर्शक व हितकारक आहे. फक्त ग्रामपंचायत निवडणूकच बिनविरोध करून गावकरी थांबत नाहीत, तर शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची असलेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूकही गावकरी सतत बिनविरोध करून आदर्श सोसायटी असल्याचे दाखवून देतात. 

तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार, ‘एक गाव-एक गणपती’ पुरस्कार, आदर्श  आमदार दत्तक गाव, विद्यापीठ दत्तक गाव, रक्तदान शिबिरात सहभाग, आयएसओ मानांकनप्राप्त ग्रामपंचायत, निर्मलग्राम  आदी विविध क्षेत्रांतील गावाचे योगदान खरोखरच लक्षणीय आहे. गावाच्या विकासासाठी लहान- मोठा हा भेदभाव न करता गावातील प्रत्येकजण आपल्या पद्धतीने व तळमळीने करत  असलेली सेवा हेच या गावाच्या विकासामागचे गुपित  आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील विविध मंडळे, सामाजिक कार्यकर्ते व त्यांची धडपड ही संपूर्ण गावाबरोबरच महाराष्ट्राला आदर्शवत ठरत आहेत. एक गाव सुधारले की त्या गावातील, त्या भागातील लोकांनाही विकासाचा ध्यास निर्माण होतो आणि गावातील जनतेच्या विकासालाही त्याचा हातभार लागतो. मळेगावचा आदर्श घेऊन  सध्या अनेक गावांमध्ये गाव विकासाची स्पर्धा निर्माण होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.