होमपेज › Solapur › मका हमीभाव खरेदी केंद्रावर वेटिंगमुळे शेतकरी हवालदिल

मका हमीभाव खरेदी केंद्रावर वेटिंगमुळे शेतकरी हवालदिल

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 9:51PM

बुकमार्क करा

पानीव : विनोद बाबर

शासनाने प्रत्येक तालुक्यात मका खेरदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत मका खरेदी केंद्रे सुरू केली. पण त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव, लांबलचक प्रतीक्षा यादी, खरेदी करण्यासाठी होणारा विलंब व त्यानंतर पंधरा ते वीस दिवसाने मिळणारे पैसे यामुळे  शेतकर्‍यांची अवस्था मात्र आगीतून उठून फुपाट्यात अशी झालेली आहे.

नगदी पीक  असल्याने शेतकरी मोठया प्रमाणात याचे उत्पन्न घेतात. शेतकर्‍यांना  शेतात उत्पादित झालेली मका त्वरित विकून त्यावर दुसर्‍या पिकांसाठी लागणारी बियाणे,खते यांची तजवीज करायची असते. पण हमीभाव केंद्रात मका विकण्यासाठी शेतकर्‍यांना दोन दोन महिने वाट बघावी लागणार असेल तर त्यांनी पुढील खर्च कसा भागवायचा? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

शासनाने मका पिकासाठी 1425  रुपये इतका हमीभाव जाहीर केलेला असून व्यापारी 1100 ते  1200रूपयानी मका खरेदी करत आहेत. खरेदी केंद्रावर मका विकण्यासाठी शेतकर्‍यांना अगोदर तिथे जाऊन नोंदणी करावी लागते.यासाठी मका पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा अथवा तसा दाखला, बँक पासबुक देऊन ऑनलाइन नोंद केल्यानंतर ज्यावेळी मोबाईलवर संदेश येईल तदनंतरच खरेदी केंद्रावर जावे लागणार आहे. पण मका खरेदी केंद्रावर एवढी नोंदणी झालेली आहे की दोन महिने तरी मका खरेदीसाठी नंबर येऊ शकत नाही आणि त्यानंतर बँकेत पैसे जमा होण्यासाठी पंधरा दिवस लागणार आहेत सुमारे अडीच महीने शेतकर्‍यांना मकाच्या पैसासाठी तिष्ठत बसावे लागणार आहे त्यामुळे पुढील पिक शेतात उभा करण्यासाठी आर्थिक तजवीज कुठून करायची हा यक्ष प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा राहिला असून  नाईलाजाने शेतकर्‍यांना आपला शेतमाल व्यापार्‍यांना कवडीमोल किमतीत विकावा लागत आहे.