Thu, Apr 25, 2019 06:24होमपेज › Solapur › केंद्र, राज्य सरकारांना खाली खेचा 

केंद्र, राज्य सरकारांना खाली खेचा 

Published On: Apr 06 2018 10:07PM | Last Updated: Apr 06 2018 10:01PMमहूद : वार्ताहर

केंद्र व राज्यातील सरकारे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याने सरकारच्या विरोधात जनतेतून रोष खदखदत आहे. या सरकारांना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची जाण आहे ना तरुणांच्या प्रश्‍नांची जाण आहे. हे उद्योगपतीचे सरकार आहे. नरेंद्र मोदींनी ‘अच्छे दिन’च्या नावाखाली तरुणांचा अपेक्षाभंग केल्याने ‘बुरे दिन’ आले आहेत. शेतकर्‍यांच्या शेतमालाला आधारभूत किमतीवर हमीभाव मिळत नाही. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर भरमसाट वाढले आहेत. कर्जमाफीची घोषणा होऊनही अद्यापही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाही. केंद्र व राज्यातल्या निर्ढावलेल्या सरकारांना खाली खेचण्याचे आवाहन माजी उपमुख्यमंत्री  आ.अजीत पवार यांनी महूद (ता.सांगोला) येथील हल्लाबोल आंदोलन प्रसंगी केले.   

 यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. हणूमंत डोळस, माजी आ. राजन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

यावेळी गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने आपली फसवणूक केली आहे. छ. शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची केलेली घोषणा शेतकर्‍यांचा अपमान, अवहेलना  करणारी ठरली आहे. आजचे सरकार लाभार्थ्यांच्या भूमिकेत जनतेची फसवणूक करीत आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत या सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन सुरूच राहील. आगामी निवडणुकीत आपल्या हक्काचे सरकार निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी   केले. 
 नरेंद्र मोदींच्या अच्छे दिनच्या घोषणेवर या देशातील तरुणांनी क्रांती केली. मात्र मोदींची ही घोषणा अवघ्या चार वर्षाच्या काळात हवेतच विरली. आज तरुण अच्छे दिन न मानता बुरे दिन आले आहेत असे म्हणत परिवर्तनाच्या तयारीत आहेत. या देशातील ललित मोदी, विजय मल्ल्या, निरव मोदी, चोक्शी यांनी हजारो रु.कोटी चा बँकांना गंडा घालून देश सोडून पळून गेले. यावर मोदी मूग गिळून गप्प आहेत. केंद्र व राज्य सरकारने जनतेला मुर्ख बनवण्याचे काम आता थांबवावे. केंद्रातील व राज्यातील सरकार उलथून टाकणे व आपल्या हक्काचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच तयारीला लागावे. असे आवाहन विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंढे यांनी केले. 

माण व कोरडा नदीला कॅनालचा दर्जा द्यावा. टेंभू, म्हैसाळ योजना टेलला असल्याने बंद असलेली कामे सुरू करावीत. उजनीचे आमच्या हक्काचे 2 टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. उरमोडीचे पाणी राजेवाडी तलावात सोडून तीन पाळ्या सांगोल्याला मिळाल्या पाहिजे अशी मागणी करीत आता सांगोल्याचे घड्याळ राज्याच्या विधानसभेत गेले पाहिजे त्यासाठी अजीतदादांनी लक्ष ठेवावे असे सूचक विधान माजी आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले.खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विचार व्यक्त केले. सुत्रसंचालन लतीफ तांबोळी, मनोज उकळे यांनी तर आभार डॉ.पियुष साळुंखे-पाटील यांनी मानले. या सभेला महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,   प्रकाश शेंडगे, माजी जि.प.अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, प्रशांत बाबर, आदींसह माढा, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.