Wed, Apr 24, 2019 12:22होमपेज › Solapur › महिम गाव पंधरा दिवसांपासून अंधारात

महिम गाव पंधरा दिवसांपासून अंधारात

Published On: Dec 01 2017 11:17PM | Last Updated: Dec 01 2017 10:36PM

बुकमार्क करा

महूद : वार्ताहर

महिम  (ता.सांगोला) येथील गावठाण भागाला वीजपुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मर गेल्या पंधरा दिवसापूर्वी जळाला आहे.त्यानंतर हा ट्रान्स्फॉर्मर आजपर्यंत सहावेळा बदलण्यात आला आहे.मात्र त्यावर मोठा भार असल्याने तो लगेचच जळाला आहे. यामुळे महिम गांव गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात असून गांवचा पाणी पुरवठाही पंधरा दिवसापासून बंद आहे.शिवाय विजेअभावी पिठाच्या गिरण्याही बंद असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी व भाकरीसाठी वणवण सुरू आहे.

महिम गांवठाणाला वीजपुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मर हा 63 अ‍ॅम्पियर क्षमतेचा होता.तो गेल्या पंधरा दिवसापुर्वी जळाला. महिम ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वीजमंडळाकडे हेलपाटे मारून नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविला. मात्र, नवीन ट्रान्स्फॉर्मर लगेचच जळाला.असे वारंवार सहा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आले.प्रत्येक वेळी तो अर्धा ते एक तास चालून जळतो आहे.एकही ट्रान्स्फॉर्मर चालला नाही.प्रत्येकवेळी ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात दिवस जात होते. असे पंधरा दिवस झाले तरी अजून पर्यंत महिम गावात विजेची सोय झाली नाही.विजेअभावी गावातील पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीवरील मोटार बंद आहे. त्यामुळे गावचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून बंद आहे. गावातील पिठाच्या गिरण्याही बंद आहेत.यामुळे ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत.

वीज मंडळाचे कर्मचारी व येथील अधिकारी मनमानी करीत असून आम्हा नागरिकांचे महूदचे शाखा अभियंता फोनही स्वीकारत नाहीत. त्यांना नागरिकांच्या समस्याबाबत काहीही देणेघेणे नाही चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.