Wed, Mar 20, 2019 08:38होमपेज › Solapur › श्री क्षेत्र सासुरे येथील श्री महंकाळेश्‍वर

श्री क्षेत्र सासुरे येथील श्री महंकाळेश्‍वर

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 19 2018 10:27PMवैराग : आनंदकुमार डुरे
भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिन्याला आणि प्रत्येक सणाला एक वेगळे महत्त्व आहे. त्यात मराठी महिन्यातील श्रावण महिन्याला अधिक महत्त्व आहे. या श्रावण महिन्यात महादेव आणि महादेवाची अधिष्ठान असलेल्या मंदिरात भक्तांची मांदियाळी जमते.असेच एक ऐतिहासिक दृष्टीने प्रसिद्ध असलेले देवस्थान म्हणजे मौजे सासुरे येथील श्री महंकाळेश्‍वर देवस्थान होय.

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभलेल्या सासुरे येथील श्री महंकाळेश्‍वराचे श्रावण महिन्यात दर्शन घेणे पुण्यकर्म समजले जाते, त्यामुळे संपूर्ण श्रावण महिना भाविकांची मांदियाळी या मंदिरात असते. श्री क्षेत्र उज्जैनचा अधिवास लाभल्याने श्रावणी सोमवारचे औचित्य साधून अनेक भाविक विशेष दर्शनासाठी  सासुरे (ता. बार्शी) गावी जमतात. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे सासुरे गाव नागझरी नदीच्या तिरावर वसले आहे. श्री महंकाळेश्‍वराचे जागृत देवस्थान असलेले सासुरे हे शिवभक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. श्रावण महिन्यात श्री महंकाळेश्‍वराचे दर्शन घेणे पुण्यवत असल्याने भाविक गर्दी करतात. मध्यप्रदेशातील उज्जैन हे श्री महंकाळेश्‍वराचे मूळ स्थान आहे. मात्र सासुरेच्या दयाळराजे आवारे ह्या अवतारी पुरूषामुळे उज्जैनच्या दैवत्वाला सासुरेला यावे लागले. दयाळराजेंच्या सात पिढ्यांनी पायी चालत जाऊन उज्जैनच्या वार्‍या केल्या. या भक्तीमागे कोणताही स्वार्थ दडला नसल्याने स्वतः श्री महंकाळेश्‍वर सासुरे गावामध्ये प्रकटले. तेव्हापासून आजतागायत अविरहित श्री महंकाळेश्‍वराची सेवा चालू आहे. संपूर्ण मंदिर हेमाडपंथी असून 56 फूट उंच शिखर आहे. या शिखरावर विविध शिल्पकला कोरण्यात आल्या आहेत. शिवलिंग स्वयंभू असून शेषशाही नागनाथ पाच फूट उंचीचे असून फणा काढलेला आहे. मंदिरात बारा जोतिर्लिंग असून 29 शिवलिंगही आहेत. इथेच श्री महंकाळेश्‍वराचे परमभक्त दयाळराजे यांची संजीवन समाधी आहे. कार्तिक पौर्णिमेला पाच दिवस मोठी यात्रा भरते. मात्र श्रावणात महिनाभर भाविक मोठी गर्दी करतात व श्री महंकाळेश्‍वरास जलाभिषेक, रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक आदी अभिषेक घालतात. सास ऋषींनी वसवलेल्या या नगरीत पांडव अज्ञातवासात असताना वास्तव्य करून पुढील प्रवासास निघून गेले. नागझरी नदीला सासुरे येथे सहा ओढे नद्या रूपाने मिळतात. त्यामुळे विविध ठिकाणी निर्माण झालेल्या संगमांना भाविक भेटी देतात. अशा तिर्थक्षेत्राच्या दर्शनाने मनोरथ पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात भाविक आवर्जून सासुरे गावी श्री महंकाळेश्‍वराच्या दर्शनासाठी जातात आणि दर्शनाने तृप्‍त होतात.