होमपेज › Solapur › माघी यात्रेची तयारी जोमात; अन्‍न निरीक्षक विभाग कोमात

माघी यात्रेची तयारी जोमात; अन्‍न निरीक्षक विभाग कोमात

Published On: Jan 23 2018 9:37PM | Last Updated: Jan 23 2018 9:17PMपंढरपूर : प्रतिनिधी 

शहरातील हॉटेल व बेकरी तसेच हातगाड्यांवर तयार करण्यात येणार्‍या भेसळयुक्त अन्नपदार्थांची अन्न निरीक्षकांकडून तपासणी करण्यात येत नसल्याने भाविकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. एकीकडे प्रशासन माघी वारीची तयारी जोमात करीत असताना अन्न निरीक्षक विभाग मात्र कोमात असल्याचे दिसून येते. त्यामुळेच उघड्यावर अन्नपदार्थ तयार करणे, शिळे अन्नपदार्थ विक्री करणे आदी प्रकार वाढले आहेत. हॉटेल व्यावसायिकांशी अर्थपूर्ण  संबंधं असल्यामुळे  तपासणीकडे जानीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा नागरिकातून व्यक्‍त केली जात आहे.

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक दाखल होत आहेत. या भाविकांना आपली वाहने नियोजित पार्किंगच्या ठिकाणी उभी करावी लागतात. या पार्किंगच्या परिसरात छोटी मोठी हॉटेल, हातगाडे, टपर्‍यांवर उघड्यावर अन्नपदार्थ तयार करणे व त्याची विक्री करणे, स्वच्छता न बाळगणे, अन्नपदार्थात माशा, झुरळ सापडणे आदी प्रकार सर्रासपणे घडत आहेत. याबाबत भाविक व नागरिकांनी तक्रार केली तर त्याची फारशी दखल घेतली जात नाही. 

पंढरपूर न.पा.कडे  कार्यरत असणारे अन्न निरीक्षकांना सर्व परिस्थितीची जानीव असतानाही  याकडे दुर्लक्ष करीत मनमानी कारभार सुरू आहे.  

माघी यात्रा पाच सहा दिवसांवर येऊन ठेपली असल्याने  शहरातील तसेच पालखी मार्गावरील वारी कालावधीसाठी येणारी तात्पुरती हॉटेल, टपर्‍या, हातगाडे यांची तपासणी होणे गरजेचे आहे. माघी यात्रेत जरी अन्न व औषध प्रशासनाची टिम पंढरीत येणार असली तरी त्यांच्याकडून म्हणावी तशी कामगिरी होत नाही.  

यातच तालुक्यासाठी एकच अन्ननिरीक्षक असून तोही निष्क्रीय असल्याने हॉटेल व्यावसायिकांची मात्र चलती असल्याचे वास्तव चित्र दिसून येते. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.