होमपेज › Solapur › महिला शेतकर्‍याच्या सात-बारा उतार्‍यावर साडेतेरा कोटींचा बोजा

महिला शेतकर्‍याच्या सात-बारा उतार्‍यावर साडेतेरा कोटींचा बोजा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

माढा : मदन चवरे

माढ्यातील महिला शेतकर्‍याच्या सात-बारा उतार्‍यावर न घेतलेल्या कर्जाचा साडेतेरा कोटी रुपयांचा बोजा चढविल्याने संबंधित शेतकर्‍याच्या कुटुंबावर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी महसूल व दुय्यम निबंधक कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने आता न्याय कोठे मागावा, या विवंचनेत हे कुटुंब सापडले आहे.

 माढा येथील महिला शेतकरी शालनबाई गजेंद्र घोलप यांचा मुलगा शरद घोलप याने गृहकर्ज तारणासाठी सात-बारा उतारा काढला असता इतर हक्‍कात कोटक महिंद्रा शाखा टेंभुर्णी यांचे साडेतेरा कोटी रुपये कर्ज घेऊन गहाणखत करून दिल्याची नोंद झाल्याचे निदर्शनास आले. या रकमेचे आपण कर्जच घेतले नसल्याने व कोणालाही जामीन नसताना एवढ्या मोठ्या रकमेचा बोजा आपल्या  2  हे. 64  आर. जिरायती जमिनीवर आल्याचे पाहून त्यांचे धाबे दणाणले. याबाबत त्यांनी सर्वप्रथम तलाठ्याकडे चौकशी केली असता ही नोंद  ऑनलाईन पध्दतीने झाली आहे. त्यामध्ये आमचा काही संबंध नाही असे सांगून जबाबदारी झटकली. त्यानंतर शरद घोलप यांनी निवासी नायब तहसीलदार एस. पी. मुंडे यांची यासंदर्भात भेट घेतली. मुंडे यांनी फेरफार काढून पाहणी केली. कोणत्या दस्त नंबरने ही नोंद करण्यात आली तो दस्त दुय्यम निबंधक कार्यालयाकडून काढण्यास सांगितले. त्या दस्तान्वये पिंपळनेर, माढा व टेंभुर्णी याठिकाणच्या वेगवेगळ्या गट नंबरचे गहाणखत झाले. यामध्ये अनिल दत्तात्रय वीर, रणजित बबनराव शिंदे, विक्रमसिंह बबनराव शिंदे, संतोष हनुमंत मराठे यांनी कोटक महिंद्रा बँक शाखा टेंभुर्णीतर्फे मॅनेजर श्रीनिवास नागनाथ मुळे यांच्याकडून साडेतेरा कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्या जमिनीचे गहाणखत करुन दिल्याचे निदर्शनास आले.

या गहाणखतान्वये पिंपळनेर येथील गट नंबर   415/1 यावर हा बोजा चढणे गरजेचे असताना तो माढा येथील शेतकरी शालनबाई घोलप यांच्या गट नंबर 415/1 यावर चढविला गेल्याने हा गोंधळ उडाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. या संपूर्ण प्रकरणात महसूल व दुय्यम निबंधक कार्यालयाने जबाबदारी झटकण्याची भूमिका अनाकलनीय अशी आहे. ऑनलाईन सात-बारा या शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे.


  •