Sat, Sep 22, 2018 09:14होमपेज › Solapur › वादळामुळे दगड पडून शेतकर्‍याचा मृत्यू

वादळामुळे दगड पडून शेतकर्‍याचा मृत्यू

Published On: Apr 18 2018 10:26PM | Last Updated: Apr 18 2018 10:18PMमाढा : वार्ताहर

माढा तालुक्यात मंगळवारी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मानेगाव येथे वादळी वार्‍याने घरावरील पत्रे उडाले. त्यावेळी पत्र्यावरील दगड व कुंभीचे दगड डोक्यात पडून लक्ष्मण तात्या मोटे (वय 40) या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. तालुक्यात विविध ठिकाणी पडलेल्या विजेमुळे दोन जनावरे दगावली. विजेच्या तारा तुटून अंगावर पडल्याने चार शेळ्यांचा मृत्यू झाला. 

अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. तालुक्यात विविध गावांतील केळी, द्राक्ष व आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मानेगाव येथे वादळी वारे सुटल्याने शेतात काम करत असलेले लक्ष्मण मोटे यांनी जवळच असलेल्या रेणूबाई मोटे यांच्या घरात आश्रय घेतला. वादळीवार्‍यामुळे रेणूबाई मोटे यांच्या घरावरील पत्रे उडाले. पत्र्यावरील दगड हे लक्ष्मण यांच्या डोक्यात  पडल्याने ते जखमी झाले. उपचारार्थ त्यांना बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर बुधवारी सकाळी मानेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. मृत लक्ष्मण तात्या मोटे यांच्या कुटुंबाला व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बेदाणा शेड व बागांना तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी भेट देऊन पाहणी केली.