Fri, Apr 26, 2019 04:10होमपेज › Solapur › बचतगटाच्या उत्पादनांना भांडवल देणार : सहकारमंत्री

बचतगटाच्या उत्पादनांना भांडवल देणार : सहकारमंत्री

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 8:59PM

बुकमार्क करा
माढा : वार्ताहर

महिलांनी केलेली बचत कुटुंबास फार मोलाची ठरते. बचत ही काळाची गरज आहे. महिलांनी आपल्या भांडवलातून स्वयंरोजगाराची निर्मिती करावी. अशा प्रकारच्या व्यवसायास भांडवल व बाजारपेठची गरज  लागल्यास शासन त्यांना मदत करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. ते माढा तालुक्यातील बावी येथील स्वाभिमान शेतकरी व महिला बचत गटाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी बचत गटाचे संस्थापक दत्तात्रय मोरे, भाजप तालुकाध्यक्ष संजय कोकाटे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील, जलतज्ज्ञ अनिल पाटील, बावीचे सरपंच मुन्नाराजे मोरे, जनहित शेतकरी संघटनेचे संभाजी पाटील, संत निरंकारी मंडळाचे रामचंद्र मोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत मोरे, कल्याण मोरे, सुहास मोरे, औदुंबर पाटील, शरद मोरे, कृष्णात मोरे, सिंधुबाई मोरे, उत्कर्षा मोरे आदी उपस्थित होते.

ना. देशमुख पुढे म्हणाले की, भाजपचे सरकार शेती व शेतकरी यांच्यासाठी अनेक योग्य आणि चांगले निर्णय घेत असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी बाजारभावापेक्षा चढ्या दराने शेतमाल खरेदी करण्याचे काम आज सरकार करते आहे. रासायनिक खताबाबतीत होणारा काळा बाजार बंद करून त्याचे भाव देखील सरकारने स्थिर ठेवले आहेत. ज्यांचा याबाबतीतला काळा बाजार बंद झाला तेच सरकार शेतकरी विरोधी असल्याचा कांगावा करत आहेत.या कार्यक्रमास गटातील सर्व सदस्य व गावातील बहुसंख्य शेतकरी व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता मोरे यांनी, तर आभार रेश्मा मोरे यांनी व्यक्त केले.