Mon, Mar 18, 2019 19:19होमपेज › Solapur › खा. शेट्टी-शिवाजी कांबळे यांच्यात राजकीय गुफ्तगू

खा. शेट्टी-शिवाजी कांबळे यांच्यात राजकीय गुफ्तगू

Published On: Dec 12 2017 2:11AM | Last Updated: Dec 11 2017 10:27PM

बुकमार्क करा

माढा : मदन चवरे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी व जिल्हा परिषद समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या दोघांत बंद खोलीत सुमारे अर्धा तासांहून अधिक काळ चर्चा झाली. या दोन नेत्यांमध्येे नेमके काय गुफ्तगू झाले ते मात्र समजू शकले नाही. या दोन नेत्यांमधील या भेटीने जिल्ह्यातील राजकारणावर आगामी काळात परिणाम होऊ शकतात.

रिधोरे येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याच्या लग्नसमारंभासाठी खा. राजू शेट्टी हे आवर्जून उपस्थित राहिले होते. लग्नसमारंभानंतर त्यांनी शिवाजी कांबळे यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. विविध शेतकरी संघटनांनी आंदोलने करीत एफआरपी अधिक चारशे रुपये हा फॉर्म्युला कारखानदारांना पहिल्या उचलीसाठी दिला होता. सहकारमंत्री सुभाष देशमुख वगळता इतरांनी अद्यापही तो मान्य केला नाही. माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात ठरलेल्या तोडग्याप्रमाणे दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यास प्रत्युत्तरादाखल विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या सभासदांनीही प्रतिआंदोलन केले होते.

या पार्श्‍वभूमीवर खा. शेट्टी व  शिवाजी कांबळे यांची बंद खोलीत चर्चा झाली असल्याने या भेटीस अनेक कंगोरे असल्याचे अधोरेखित होत आहे. एकतर शिवाजी कांबळे हे पूर्वाश्रमीचे आ. बबनराव शिंदे व संजयमामा शिंदे यांचे खंदे समर्थक होते. शिवाजी कांबळे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे बंधूंनी तिकीट नाकारले. ते अपक्ष उभे राहिले तर त्यांचा पराभव घडवून आणला. अशा राजकीय स्थितीत कांबळे हे शिंदे बंधूंपासून दुरावले गेले आहेत. स्वाभिमानीची माढा तालुक्यात पुनर्बांधणी करताना शिवाजी कांबळे यांचा उपयोग होऊ शकतो. शिवाजी कांबळे हे बिगर कारखानदार व सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व आहे याची खा. शेट्टी यांनाही कल्पना आहे. या भेटीत बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली, त्याचा माढा तालुका व विधानसभेच्या राजकारणावर आगामी काळात काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.