Tue, Jul 23, 2019 11:19होमपेज › Solapur › तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

Published On: May 09 2018 10:21PM | Last Updated: May 09 2018 10:11PMमाढा : वार्ताहर

माढ्याचे तहसीलदार सदाशिव पडदुणे यांना मारहाण केल्याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात तिघा वाळू माफियांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुंगशी येथे सीना नदीपात्रात मंगळवारी रात्री अकरा ते पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. 

यावेळी तहसीलदारांच्या शासकीय गाडीस वाळू माफियांनी ट्रॅक्टरने धडक दिल्याने ड्रायव्हरसह चार तलाठीही जखमी झाले आहेत.माढ्याचे तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्याकडे सीना नदीपात्रात अवैधरीत्या वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्याअनुषंगाने  मंगळवारी रात्री अकरा वाजता शासकीय बोलेरो गाडीतून ड्रायव्हरसह गावकामगार तलाठी ज्ञानेश्‍वर बोराडे, मधुकर काळे, प्रबुद्ध माने, राजेंद्र राऊत यांच्यासह मुंगशी येथे सीना नदीपात्रात गस्त घालत जात होते. त्यावेळी त्यांना समोरून  मोटारसायकलवरून मंगेश माणिक जगताप येत असताना दिसला. त्याच्यामागे ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह येत होता. त्यावेळी तलाठ्यांनी या वाहनांना थांबण्याचा इशारा केला. परंतु, मोटारसायकलस्वार मंगेश जगताप याने गाडीचा वेग वाढवून गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या वाहनांचा पाठलाग केल्यानंतर शासकीय गाडी ट्रॅक्टरच्या पुढे नेल्यानंतर ट्रॅक्टरने  शासकीय वाहनास धडक दिली. यावेळी गाडीत बसलेले सर्वजण जखमी झाले. याप्रकारात ट्रॅक्टर ड्रायव्हरशेजारी बसलेला सागर लोंढे यास पकडले, तर  ट्रॅक्टरचालक रघू कृष्णा खरात व मोटारसायकलस्वार मंगेश जगताप हे दोघे पळून गेले. या घटनेनंतर तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पळून गेलेल्या दोघांना फोन करून बोलावून घेतले. यावेळी त्यांना जाब विचारत असताना त्यांनी तहसीलदार पडदुणे यांच्या पोटात सागर लोंढे याने लाथ मारली. पडदुणे हे मागील खड्ड्यात पडले. यावेळी झालेल्या झटापटीत पडदुणे यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पडदुणे हे बार्शी येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. 

याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात ज्ञानेश्‍वर बोराडे यांनी फिर्याद दिली असून सागर लोंढे, रघू खरात (रा. पितापुरी, ता. परंडा, जि. उस्मानाबाद), मंगेश जगताप (रा. मुंगशी, ता. माढा) या तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.