Mon, Mar 25, 2019 05:24
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › पाणीदार फळे बाजारात दाखल

पाणीदार फळे बाजारात दाखल

Published On: Mar 24 2018 1:55AM | Last Updated: Mar 23 2018 10:35PMसोलापूर : प्रतिनिधी

वाढत्या उन्हामुळे पाणीदार फळे बाजारात  दाखल झाले आहेत. उन्हामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाटी सोलापूरकर खरबूज, कलिंगड, द्राक्षे, मोसंबी, संत्रा, अननस या फळांचे सेवन करत  शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.

शहरातील  लक्ष्मी मार्केट, कस्तूरबा मार्केट, फॉरेस्ट भाजी मंडई, सत्तर फूट रोडवरील इंदिरा भाजी मार्केट, मार्केट यार्ड येथील व्यापारी व इतर फेरीवाले फक्त कलिंगड, खरबूज, पपई, द्राक्षे, काकडी  याचा व्यवसाय करु लागले आहेत. सोलापूर शहरात मार्च, एप्रिल व मे महिन्यात कडक उन्हाचे चटके बसतात. दुपारच्या वेळी उन्हामध्ये घराबाहेर निघाल्यास त्रास जाणवतो. अशा कडक उन्हाच्या वातावरणात शरीरातील पाणीदेखील कमी होऊ लागते. याला उपाय म्हणून पाणीदार फळांचे सेवन करण्यात येते.

शहरातील सिध्देश्‍वर पेठ व विजापूर वेस येथे चिकटून मोठी बाजारपेठ म्हणून लक्ष्मी मार्केट आहे. येथील व्यापारी आसिफ बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्यामुळे  पाणीदार फळांची आवक   मोठी  होत आहे. 10 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंतचे खरबूज बाजारात आले आहेत. कलिंगड 10 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. मोसंबी 80 ते 100 रुपयांपर्यंत डझन आहे. संत्रा 100 ते 120 रुपयांना  डझन आहेत. मार्केट यार्डामधून रोज 6 ते 7  टन कलिंगड व खरबूज सोलापुरात विक्रीसाठी येत आहे. यामधून रोज एक कोटीची उलाढाल होत आहे. ही फळे मोहोळ, पंढरपूर, करमाळा, बार्शी आदी तालुक्यांतून सोलापूर शहरात येत आहेत व पुणे, मुंबईसारख्या शहरांतदेखील सोलापुरातील पाणीदार फळांची मागणी वाढली आहे.

शहरामधील सात रस्ता, होटगी रोड, व्हीआयपी रोड, शिवाजी चौक, विजापूर रोड, अक्कलकोट रोड आदी पादचारी मार्गावर खरबूज, कलिंगड, द्राक्षे, मोसंबी, संत्रे  व अननस विक्रीस उपलब्ध आहेत. शहरातील नागरिक या फळ विक्रेत्यांकडून  पाणीदार फळांची खरेदी करत आहेत. लहान मुलांना तर या फळांची आवड मोठ्या प्रमाणात आहे.शाळेवरुन आल्यानंतर पालकवर्ग आपल्या लहान मुलांना चविष्ट पाणीदार फळे  सेवनास  देत आहेत. त्यामध्ये अननस, खरबूज, कलिंगड, मोसंबी, संत्रे आदी फळे लहान मुलांना दिले जात आहेत. शाहनवाज बागवान या फळ विके्रत्यांनी माहिती देताना सांगतले की, या पाणीदार फळांसोबत आंब्याची मागणीदेखील वाढत आहे. बाजारात कैरी, हापूस आंबे, लालबाग आंबे याची आवक वाढली आहे.अनेक नागरिक कच्चे आंबे (कैरी) व पिकलेले आंबे विकत घेत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे फळांच्या मार्केटमध्येसुध्दा मोठी उलाढल होत आहे व रोजच्या रोज फळांचा दर ठरत आहे. नागरिकांच्या प्रतिसादामुळे फळ मार्केट उंचावत आहे.

थंडगार ज्यूस पिण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी वाढली
सोलापुरातील सात रस्ता, दत्त चौक, लकी चौक, नवी पेठ, शिवाजी चौक, टिळक चौक, मधला मारुती, कोंतम चौक आदी चौकांतील ज्यूस दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी खरबूज, चिकू, मँगो आदी चविष्ट व थंडगार ज्यूस पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. विविध चौकांत रसपानगृहाचे स्टॉल थाटू लागले आहेत.

गरिबांच्या फ्रीजचे महत्त्व वाढले
गरिबांचा फ्रीज म्हणून मातीच्या मटक्याला ओळखले जाते. उन्हाळ्यात माठातील पाणी प्राशन केल्याने  शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.उन्हामुळे होत असलेली लाहीलाही कमी होते. शहरातील कुंभार गल्लीत मटक्यांचे उत्पादन वाढले आहे. 40 ते 100 रुपयांपर्यंतचे मटके (माठ) उपलब्ध झाले आहेत. यंत्राच्या सहाय्याने पाणी थंड करुन पिण्यापेक्षा माठातील पाणी प्राशनाने मन अधिक तृप्त होते.

नैसर्गिक शीतपेयांचे अधिक प्राशन करावे
नागरिकांनी नैसर्गिक शीतपेयांचे सेवन करावे. त्यामध्ये शहाळ, उसाचा रस, फळांचा रस (विना बर्फ) यांचा समावेश होतो. कृत्रिम शीतपेयांनी शरीराची हानी होऊ शकते. नैसर्गिक शीतपेयांमध्ये कोणतेही रासायनिक द्रव्य नसते.कृत्रिम शीतपेये प्राशन करताना आधी त्या दुकानातील स्वच्छता तपासावी.कोणत्या प्रकारचा बर्फ वापरला जात आहे त्याची खात्री करावी.

Tags : solapur, market, lustrous fruits