Sun, Aug 25, 2019 07:56होमपेज › Solapur › गोगलगायीच्या गतीने पीक कर्जाचे वाटप

गोगलगायीच्या गतीने पीक कर्जाचे वाटप

Published On: Jul 06 2018 10:13PM | Last Updated: Jul 06 2018 10:04PMसोलापूर : इरफान शेख

जिल्ह्याकरिता खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य एप्रिल महिन्यात ठरविण्यात आले आहे. त्यापोटी जिल्ह्यातील बँकांना 911.14 कोटींचे लक्ष्य देण्यात आले आहे. जूनअखेरपर्यंतच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार 29.88 टक्केच पीक कर्ज वाटप झाले असून पेरणी हंगाम सुरू असताना हे कर्ज वाटप गोगलगायीच्या गतीने सुरू असल्याने बळीराजातून संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सर्व राष्ट्रीय व खासगी बँकांतून 414.43 कोटी रुपये अद्याप पीक कर्जापोटी मिळालेले असून ज्या बँकांनी पीक कर्जाचे शून्य टक्के वाटप केले त्या बँकांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार, याकडे शेतकरीवर्गाचे लक्ष लागलेले आहे. 

राज्य सरकारच्या सुलभ पीक कर्ज अभियानाचा बोजवारा उडाला असल्याचे जिल्ह्यात दुर्दैवी चित्र आहे. जिल्हा बँक, ग्रामीण बँका, राष्ट्रीय बँका व खासगी बँकांना पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य देण्यात आले होते; परंतु पीक कर्ज देण्यात दिरंगाई झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. मंत्रालयातून दररोज बँकांकडून पीक कर्ज वाटपाचा अहवाल मागितला जात आहे. परंतु शेतकरीवर्ग हा खासगी सावकारांच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी आजदेखील पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक राष्ट्रीय  बँका व खासगी बँकांनी टाळाटाळ केल्याने शेतकर्‍यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.

खरीप हंगामात बँकांकडून मुबलक कर्ज उपलब्ध न झाल्याने उधारी, हातउसनवारी व दागिने गहाण ठेवून खरिपाच्या पेरण्या कराव्या लागत आहेत. शेतकर्‍यांच्या गळ्यातील सावकारी फास सुटत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने राज्यभरातील व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीवर्ग पेरणीस लागला आहे. सरकारने शेतकर्‍यांसाठी सुलभ पीक कर्ज योजना आणली आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता 911.41 कोटी पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. हे लक्ष्य सप्टेंबरपर्यंत गाठण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकरीवर्ग हा एप्रिल महिन्यापासून बँकांचे हेलपाटे मारत आहे. तरीदेखील त्याला पीक कर्ज मिळालेले नाही. सरकारी, खासगी व ग्रामीण बँकांचा विचार केला असता जिल्ह्यात डीसीसी बँकेने सर्वात जास्त पीक कर्जाची रक्कम वाटप केली आहे. 94.71 कोटी एवढी रक्कम शेतकर्‍यांना पीक कर्ज म्हणून वाटप करण्यात आले आहेत. राष्ट्रीय बँकांमधील आंध्र बँकेला 1.60 कोटी लक्ष्य देण्यात आले होते. परंतु आंध्र बँकेने सर्वात कमी 3.90 लाख एवढेच पीक कर्ज वाटप केले आहे. युनायटेड बँक ऑफ इंडियाला 1.60 कोटी रुपयांचे लक्ष्य देण्यात आले होते. परंतु या बँकेने एक रुपयाचेही पीक कर्ज वाटप केले नाही.

सर्वात जास्त पीक कर्ज वाटप केलेल्या बँका जिल्हा सहकारी बँक 94.71 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया 93.71 कोटी, बँक ऑफ इंडिया 71.27 कोटी, आयसीआयसीआय 64.63 कोटी.सर्वात कमी पीक कर्ज वाटप केलेल्या बँकाआंध्र बँक 3.90 लाख, युनायटेड बँक शून्य, कोटक महिंद्रा बँक शून्य, बंधन बँक शून्य, इंडस इंड बँक शून्य व पंजाब नॅशनल बँकेने शून्य टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. या बँकांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.