Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Solapur › विसरभोळा वृद्ध पोहोचला सुखरुप घरी

विसरभोळा वृद्ध पोहोचला सुखरुप घरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : इरफान शेख

 पोलिसांमध्येदेखील  माणुसकीचा पाझर असतो. त्याचे उत्तम चित्र पाहावयास मिळाले. सिव्हिल पोलिस चौकीमधील पोलिसांनी माणुसकी जपत घरापासून दूर गेलेल्या  एका विसरभोळ्या वृध्दास सुखरुप त्याच्या परिवाराच्या स्वाधीन केले.

यल्लपा मलालू (रा. साखर पेठ, दत्तनगर, सोलापूर) हे वृध्द आपल्या राहत्या घरातून   मुलाला पाहण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी घराबाहेर पडले होते. ही वृध्द व्यक्ती विसरभोळेपणामुळे आपले घर विसरले व चालत चालत एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेले होते. 26 नोव्हेंबर  रोजी गांधीनगर पोलिस चौकीचे ठाणे अंमलदार पोहेकॉ  मुजावर हे रात्रपाळी ड्यूटीवर असताना आपल्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यांना एक वयस्कर वृध्द व्यक्ती दिसली. पेट्रोलिंगला असलेल्या मुजावर यांनी त्या वृध्दास नाव व पत्ता विचारले. परंतु त्या वृध्दास स्वत:चा नाव व  पत्ता  सांगता  आला  नाही.

त्या वृध्दाच्या  उजव्या  डोळ्याजवळ  व हातास  खरचटले होते. पोहेकॉ मुजावर यांनी जखमी  वृध्दास औषधोपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले व परत ते ड्युटीकरता रात्री 11 वाजण्याच्या सुमारास  निघून गेले.

27  नोव्हेंबर  रोजी यल्लपा   मलालू  हे  सिव्हिल हॉस्पिटलमधून निघून गेले. त्याच दिवशी या वृध्दाचे नातेवाईक शोध घेत सिव्हिल पोलिस चौकीत मध्ये आले असता त्यांनी ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचारी  सचिन जावळे यांना वृध्दाची सविस्तर माहिती सांगितली. परंतु हे विसरभोळे वृध्द सिव्हिल हॉस्पिटलमधूनदेखील निघून गेले होते. चौकीमधल्या पोलिसांनी ताबडतोब त्या वृध्दाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यल्लप्पा मलालू ही  व्यक्ती ‘सी’ ब्लॉकच्या पाठीमागे झोपलेली मिळाली.  सिव्हिल पोलिस चौकीमधील जावळे व गायकवाड या दोन्ही पोलिसांनी लगेच त्या वृध्दास उठवले व थोडे पाणी पिण्यास दिले व त्याला  पोस्टमार्टम रुम बाजूस बाकड्यावर  बसवले. संबंधित नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले व या वृध्द व्यक्तीस  नातेवाईकांच्या स्वाधीन केले. पोलिसांमधील माणूस पाहून नातेवाईकांचे डोळे पाणावले. त्यांनी  सदर बझार पोलिस स्टेशनच्या अंकित असलेल्या सिव्हिल पोलिस चौकीमधील पोकॉ सचिन जावळे  व पोकॉ अभिजित  गायकवाड यांचे आभार मानले.