Sun, Jul 21, 2019 14:53
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › रुग्णवाहिका, शववाहिका चालकांकडून लूट

रुग्णवाहिका, शववाहिका चालकांकडून लूट

Published On: Dec 26 2017 1:35AM | Last Updated: Dec 25 2017 10:29PM

बुकमार्क करा

सोलापूर ः रणजित वाघमारे

सिव्हिल हॉस्पिटल गोरगरीब, गरजू, सर्वसामान्यांना उपचारासाठी आधारवड ठरले आहे. मात्र उपचारानंतर रुग्णवाहिका व शववाहिकांच्या माध्यमातून त्यांची पुरती पिळवणूक वाहनचालक व येथील अधिकार्‍यांकडून होत आहे. त्यामुळे  सर्वसामान्यांचा विचार करता या गैरप्रकाराला आळा बसणे आवश्यक आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय येथे वेगवेगळ्या शिबिरांसाठी रूग्णवाहिकांचा वापर होतो. दुसरीकडे सिव्हिल व मेडिकल कॉलेजमधील वस्तू, साहित्य, रद्दी व इतर वाहतुकीसाठी रूग्णवाहिकेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.  मात्र रूग्णांसाठी होत नाही. परिणामी सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात खासगी रुग्णवाहिकांचा भरणा झालेला दिसून येत आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असलेल्या रूग्णवाहिकांचे लॉगबुक, वाहनांना कंपनीने दिलेले सरासरी अ‍ॅव्हरेज, वाहनचालकांनी दिलेले अ‍ॅव्हरेज, वाहनांचे किलोमीटर, अ‍ॅडव्हान्स किती उचलला, वाहनांची दुरूस्ती, याला पाठबळ असणार्‍या प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय उपअधीक्षक यांचा आशीर्वाद आदी बिले अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी तपासणे गरजेचे आहे. तसेच शवविच्छेदनगृहाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात खासगी शववाहिका उभ्या असलेल्या दिसून येतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रूग्णांच्या नातेवाईकांची ‘आर्थिक’ लूट केली जाते. येथील गोरगरीब, गरजू रुग्णांच्या नातेवाईकांकडे अपुरे पैसे असल्यास शव घेऊन जाण्यास  नकार दिला जातो. पैशामुळे अडवणूक केली जाते. येणारा रूग्ण व त्याचे नातेवाईक सर्वसामान्य, गोरगरीब असल्याचे विचारात घेतले जात नाही.  त्यामुळे या सर्वसामान्यांची अडवणूक व पिळवणूक करणार्‍या शववाहिकांचे परवाने, आरटीओ पासिंग, रोड टॅक्स, इन्शुरन्स, पीयुसी आदी कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या लुटीवर बंधने असणे गरजेचे आहे.