होमपेज › Solapur › सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण?

सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण?

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:09PMपंढरपूर: प्रतिनिधी

लाकेसभा निवडणुकीस आता जेमतेम सव्वा वर्षाचा कालावधी उरला असल्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकीची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे, त्यांच्या कन्या आ. प्रणिती शिंदे यांच्यासह भाजपचे विद्यमान खा. शरद बनसोडे, खा. अमर साबळे यांच्याही नावाची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेकडून नेमके उमेदवार कोण असतील याकडे आतापासूनच मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या बालेकिल्ल्यात अधून-मधून कमळही उमलत आलेले आहे. त्यापैकी दोन वेळा थेट सुशिलकुमार शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. उज्वलाताई शिंदे यांनाच पराभूत करून भाजपने ही जागा जिंकलेली आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजपही या मतदारसंघात कमी नसल्याचे राजकीय वास्तव आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी सुशिलकुमार शिंदे  हे केंद्रीय गृहमंत्री होते तरीही सुमारे 1 लाख 75 हजार मतांनी त्यांचा  परावभ झाला होता. भाजपचे खा. अ‍ॅड. शरद बनसोडे हे अनेक गावात प्रचारासाठी न जाताही विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी झाले. मात्र मागील साडे तीन वर्षात त्यांच्याकडून जनतेचा भ्रमनिरास झाल्याचे दिसत आहे. त्यांचा संपर्क नाही. विकासकामे दिसत नाहीत. मतदारसंघातील प्रश्‍नांसंदर्भात त्यांकडून कसलेही प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आज घडीला सोलापूर लोकसभा मतदारसंघात खा. बनसोडे यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात प्रतिकूल जनमत तयार झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाला ही जागा पुन्हा ताब्यात घेण्याकरिता संधी निर्माण झाली आहे. या पोषक वातावरणाचा लाभ घेण्यासाठी काँग्रेसकडून सक्षम उमेदवार दिला जावा अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्याकरिता खुद्द सुशिलकुमार शिंदे यांनीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तर त्यांच्याऐवजी त्यांची कन्या आ. प्रणिती शिंदे याही निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशीही शक्यता व्यक्‍त होत आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे 3 आमदार आहेत तसेच पारंपरिक मतदार पाठीशी असल्यामुळे काँग्रेसला जागा जिंकणे शक्य असल्याचे मानले जात आहे. 

दरम्यान भाजपकडून पुन्हा आपणच निवडणूक रिंगणात असून आणि जिंकून येऊ असा विश्‍वास व्यक्‍त करीत असलेल्या खा. बनसोडे यांना पुन्हा संधी दिली जाणार का याबाबतही उलट-सुलट चर्चा सुरू झालेली आहे. त्यांची नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली आहे. तसेच भाजपमधील दोन्ही देशमुखांसोबत त्यांचे फारसे सख्य नाही त्यामुळे भाजपमध्ये आता बनसोडे यांना उमेदवारीबाबत फारसे चांगले मत नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे पक्षाकडून पर्याय म्हणून राज्यसभा सदस्य खा. अमर साबळे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झालेली आहे. माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनीही अधुन-मधुन भाजप प्रवेशाचे संकेत दिलेले आहेत. त्यांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांनाही पक्ष संधी देऊ शकतो असे बोलले जाता आहे. या व्यतिरिक्‍त ऐनवेळी भाजपकडून एखादे नवीन नावही पुढे येण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. काँग्रेसकडून शिंंदे पिता कन्येशिवाय दुसरे नाव समोर येत नाही परंत भाजपकडून खा. बनसोडे यांच्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असतील याची आतापासूनच चर्चा सुरू झाल्याचे दिसून येते.