Fri, Mar 22, 2019 02:15
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › लोकमंगलचे पुरस्कार जाहीर

लोकमंगलचे पुरस्कार जाहीर

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 8:47PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

लोकमंगल वाचनालयातर्फे यंदाचे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह, सोलापुरी चादर, रोप व रोख रक्कम असे असल्याची माहिती रोहन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.हा पुरस्कार सोहळा 23 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास होणार आहे.

लोकमंगल वाचनालयातर्फे दरवर्षी लोकमंगल साहित्य पुरस्कार दिला जातो. यंदाचे तिसरे वर्ष आहे. 1500 पुस्तकांचा अभ्यास करून या साहित्यिकांची निवड करण्यात आल्याची माहिती दिनकर देशमुख व शोभा बोल्ली यांनी दिली. यंदाच्या वर्षी ललीत लेखनासाठी ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाचे लेखक नितीन रेंडे, ‘आषाढ बार’ या नाटकाचे लेखक मकरंद साठे, ‘इन्स्टॉलेशन’ या कथेचे लेखक गणेश मतकरी व ‘खेळ’ या अनियतकालिकाचे संपादक मंगेश नारायण काळे यांना यंदाचा लोकमंगल साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे.पुरस्कारासोबत पहिल्या तीन लेखकांना 25 हजार रुपये रोख बक्षीस व चौथ्या लेखकास 15 हजार रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे.सोलापूरच्या चादर उद्योगांना चालना देण्यासाठी सोलापुरी चादरीदेखील पुरस्कारासोबत देण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये शिरीष देखणे, राज काझी, नितीन वैद्य, प्रा. ऋचा कांबळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत लेखक व पत्रकार विनय हर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. या पत्रकार परिषदेस दिनकर देशमुख, अनिता ढोबळे, शोभा बोल्ली, रोहन देशमुख, शिरीष देखणे, नितीन वैद्य आदी उपस्थित होते.