होमपेज › Solapur › पोलिस चौकीच डेंजर झोनमध्ये

पोलिस चौकीच डेंजर झोनमध्ये

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

होटगी स्टेशन येथील  लोहमार्ग पोलिस चौकीची इमारत अत्यंत धोकादायक झाली आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून या इमारतीचे कसल्याही प्रकारचे डागडुजीकरण न झाल्याने इमारत हळूहळू ढासळू लागली आहे. येथे कार्यरत असणारे लोहमार्ग पोलिसांचे जवान जीव मुठीत धरुन काम करत आहेत.

होटगी स्टेशन हे मोठे जंक्शन असल्याने प्रत्येक एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्याना थांबा आहे तसेच येथे रुळांचे मोठे जाळेदेखील विकसित झाले आहे. येथे प्रवाशांच्या सेवेसाठी लोहमार्ग पोलिस चौकीसुध्दा उपलब्ध आहे.होटगी जीआरपी पोलिस चौकी सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या अंकित आहे. सोलापूर रेल्वेस्थानकाला चिकटूनच लोहमार्ग पोलिस ठाणे कार्यरत आहे. एकूण 65 पोलिसांचा स्टाफ सोलापूर येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. होटगी स्टेशन येथील लोहमार्ग पोलिस चौकीत पाच पोलिस हवालदार कार्यरत आहेत. पुणे येथे लोहमार्ग पोलिस मुख्यालय आहे. याचे प्रमुख डॉ. प्रभाकर बुधवंत आहेत, तर अ‍ॅडिशनल एसपी म्हणून तुषार पाटील कामकाज पाहतात. मौला सय्यद सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

मोठे जंक्शन असणार्‍या होटगी स्टेशन येथील पोलिस चौकीची इमारत मात्र धोकादायक झाली आहे.चौकीचे छत संपूर्णपणे ढासळलेले आहे. एकेक कौलारू घसरुन  पडू लागले आहेत. यापूर्वी लोहमार्ग अ‍ॅडिशनल एसपी तुषार पाटील  यांनी येथे भेट दिली होती. चौकीची इमारत पाहून रेल्वे प्रशासनास तसे पत्र देऊन या इमारतीचे डागडुजीकरण करण्यात यावे, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी या अ‍ॅडिशनल एसपीच्या मागणी पत्राला केराची टोपली दाखविली. काही दिवसांपूर्वी एक प्रवासी तक्रार करण्यासाठी होटगी येथील लोहमार्ग पोलिस चौकीत गेला असता त्याच्या डोक्यावरच इमारतीचा इमला पडला.सुदैवाने त्या प्रवाशाला कोणतीही इजा झाली नाही. घडलेली घडना तेथील लोहमार्ग पोलिसांनी वरिष्ठांना कळविली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी रेल्वे प्रशासनाला इमारतीचा अहवाल लेखी पाठवून दिला. परंतु नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने आलेल्या सूचनेला केराची टोपली दाखविली.

मध्य रेल्वे  प्रशासनाचे  अनेक अधिकारी सोलापूर डीआरएम विभागात येतात. परंतु एकदाही या इमारतीकडे डोकावून पाहात नाही.अनेक लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रशासनास अनेक पत्रव्यवहार होऊनदेखील त्याची दखल घेतली जात नाही, अशी खंत लोहमार्गाच्या एका कॉन्स्टेबलने बोलताना सांगितली. 

Tags : Solapur, Solapur News ,lohmarg Police Station, building, dangerous condition, Hotgi Junction


  •