Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Solapur › नोकरदार शेतकर्‍यांची नावे कर्जमाफीच्या यादीत

नोकरदार शेतकर्‍यांची नावे कर्जमाफीच्या यादीत

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 8:49PM

बुकमार्क करा

सोलापूर: प्रतिनिधी    

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक सरकारी नोकरदार आणि इनकम टॅक्स भरणार्‍या शेतकर्‍यांच्या नावे कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस येत असून यावर शासनाने केलेली याद्यांची पडताळणी बोगस असल्याचे लक्षात आले असून याची चौकशी करण्याची मागणी आता पुढे येत आहे.

राज्य शासनाने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोलापूर जिल्ह्याला जवळपास 300 कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र सरसकट शेतकर्‍यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी, नोकरदार आणि इनकम टॅक्स भरणारे असल्याची उघडकीस येत आहे. त्यामुळे आता नवा गोंधळ सुरु झाला आहे. 

कर्जदार शेतकर्‍यांच्या नावे कर्जमाफीची रक्कम जमा करतानाच याद्या तपासून पैसे जमा करणे अपेक्षित होते. मात्र पैसे जमा केल्यानंतर हा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे सगळीकडेच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जमाफीच्या याद्या गावस्तर आणि जिल्हा स्तरावर पडताळणी करताना अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गावात चावडी वाचन करताना कोणीच कोणावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे सरसकट याद्या पुढे पाठविण्यात आल्या आहेत. तसेच तालुकास्तरीय समितीनेही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जशाच्या तशा याद्या पुढे बँकेला सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरसकट शेतकर्‍यांच्या नावावर पैसे जमा झाल्याने यामध्ये अनेक बडे शेतकरीही आढळून आल्याचे प्रकार आता हळुहळू पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे मुळातच मोठ्या कसरतीतून चाललेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत आता नवा वाद निर्माण झाला असून यामध्ये अशा शेतकर्‍यांची चौकशी का केली नाही, असा प्रश्‍न आता चव्हाट्यावर आला आहे. तर शासनाने यासाठी तयार केलेल्या स्वॉफ्टवेअरमध्येही तशी सोय नसल्याने असे शेतकरी बाजूला काढणे यंत्रणेला अशक्य झाल्याने सरसकट पैसे जमा करण्यात आले असून यापुढे आता बँकांनीही हात टेकले आहेत.