Wed, Jul 24, 2019 12:50होमपेज › Solapur › अकरा शेतकर्‍यांच्या उतार्‍यांवर दीड कोटीचा बोजा!

अकरा शेतकर्‍यांच्या उतार्‍यांवर दीड कोटीचा बोजा!

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:47PMअक्कलकोट : वार्ताहर

तडवळ भागातील सीना व भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या तस्करांना आपल्या शेतातून रस्ता देऊन मदत करणार्‍या तीन गावांतील अकरा शेतकर्‍यांना तहसीलदारांनी झटका दिला आहे. या अकरा शेतकर्‍यांच्या उतार्‍यावर 1 कोटी 41 लाख 75 हजार रुपयांचा बोजा चढविण्यात येणार असून, याबाबत तहसीलदारांनी नोटिसा बजावल्या आहेत.या नदीतून 405 ब्रास वाळू  उपसा झाल्याने शासकीय दंडानुसार 1 कोटी 41 लाख 75 हजार रुपये दंडाला जबाबदार धरून संबंधित शेतकर्‍यांच्या 7/12 उतार्‍यावर बोजा चढविण्याबाबत तहसील कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 
तडवळ भागातील सीना व भीमा या नदीपात्रातून शासनाने वाळू उपशासाठी दिलेली मुदत गेल्या सहा महिन्यांपूर्वी संपलेली असतानाही अनेक ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी आजही चालू ठेवली आहे. यांना पायबंद घालण्यासाठी पोलिस अधीक्षक (ग्रामीण) सोलापूर व तहसीलदार अक्कलकोट यांनी विविध प्रकारच्या उपाययोजना, दंडात्मक कारवाई, गुन्हा दाखल अशा विविध प्रकारच्या कारवाईचा बडगा उचलला होता. तरीही वाळू तस्करी सुरूच होती.  

यामुळे दररोज लाखो रुपयांची शेकडो ब्रास वाळू चोरी होत आहे. या घटनेस ज्या त्या भागातील मंडल अधिकारी व गाव कामगार तलाठी हे जबाबदार आहेत. या वर्गांनी या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची खंत दस्तुरखुद्द तहसीलदार यांनी त्यांच्या नियमित बैठकीत व्यक्त केली होती. अखेर संतापलेल्या तहसीलदारांनी पहिल्या टप्प्यात कुडल येथील अर्जुन घं. मरगुर (गट क्र. 76/2), भीमराया चि. मरगूर (गट क्र.77/2), संगीता सि. मरगूर (गट क्र.78/1) (सर्व रा. कुडल, ता. अक्कलकोट) यांनी 80 ब्रास अवैधरीत्या वाळू उपशास पाठीशी घातले म्हणून 29 लाख
12 हजार रुपये इतका बोजा चढविला. 

गुड्डेवाडी येथील शेतकरी श्रीशैल बा. ढब्बे (गट क्र. 84) यांनी 125 ब्रास अवैध वाळू उपशासाठी संबंधित वाळू चोरट्यांना पाठिशी घातले आहे. याबरोबरच कोर्सेगावतील दशरथ हि. बम्मणगे (गट क्र. 220/1/अ/5), संगप्पा हि. बम्मणगे (गट क्र. 211), गुरबाळ रा. बम्मणगे (गट क्र. 220/1/ब/1/अ), मलकारी गु. उमदी (ग.क्र. 194/1), लक्ष्मण बा.उमदी (ग.क्र. 194/2), सिध्दण्णा भि. हत्ती (ग.क्र. 192/1), सिध्दप्पा ब. करजगी (ग.क्र. 172/1/ब/1) यांनी 200 ब्रास वाळू अवैधरित्या उपसा करून चोरट्यास सहकार्य केल्याचा ठपका ठेवला आहे. ही वाळू कोर्सेगाव येथील गायरान गट क्र.1 येथे साठवणूक केली होती. 

अशा एकूण तीन गावांच्या 11 शेतकर्‍यांनी या नदीतून 405 ब्रास वाळू अवैधरित्या उपसा करण्यात वाळू चोरट्यांना आपल्या शेतातून वाळू वाहतूक करण्यासाठी मूकसमंती दिली होते. यामुळे शासनाचा 1 कोटी 41 लाख 75 हजार रुपये इतक्या रकमेचा महसूल बुडाला आहे म्हणून या शेतकर्‍यांना जबाबदार धरून संबंधित गावच्या तलाठ्यांना 26 मार्च रोजी याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यावरून संबंधित शेतकर्‍यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत खुलासा सादर न केल्यास या शेतकर्‍यांच्या 7/12 उतार्‍यावर या रकमेचा बोजा चढविण्याची कारवाई तहसीलदार हनुमंत कोळेकर करणार आहेत. यामुळे या भागातील शेतकरीवर्गात एकच खळबळ उडाली आहे.

Tags : Solapur, loan, 4, cores,  farmers, account