Mon, Jun 24, 2019 21:51होमपेज › Solapur › पारेवाडी, केत्तूर भागात हातभट्ट्या उद्ध्वस्त

पारेवाडी, केत्तूर भागात हातभट्ट्या उद्ध्वस्त

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 8:52PM

बुकमार्क करा

करमाळा : तालुका प्रतिनिधी

करमाळा पोलिसांनी पश्‍चिम भागातील पारेवाडी, केत्तूर भागात पुन्हा अवैध धंद्यांविरूध्द छापे मारले असून तिघा दारू काढणार्‍यांसह एका मटका घेणार्‍यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावेळी टाकलेल्या धाडीत तीन अवैध दारू काढणार्‍या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. तर तीन बेकायदेशीर दारूधंदा करणार्‍यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गणेश वसंत पवार (वय 28, रा. पारेवाडी, तालुका करमाळा), भिमाबाई रूपचंद पवार (वय 40, रा. पारेवाडी, तालुका करमाळा), नागेश प्रभाकर पिंपळे (वय 27, रा. केत्तूर क्रमांक 2), उमेश मनोज घोरपडे (वय 30, रा. पोमलवाडी, तालुका करमाळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.

उजनीकाठच्या काही गावांत अवैध दारूविक्री व हातभट्टी निर्मिती राजरोसपणे चालू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक राहुल गोंधे, महमद रफीक हैदर पटेल, प्रदीप पर्वते, अमोल बाबुराव जगताप आदींच्या पोलिस पथकाने छापे  टाकून तीन ठिकाणच्या हातभट्टी निर्मिती करणार्‍या अवैध हाभट्ट्यां उद्ध्वस्त केल्या. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पहिल्या ठिकाणी पारेवाडी येथील गणेश पवार यांच्या घरामागे चालू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर जाऊन पोलिसांनी सर्व साहित्य ताब्यात घेऊन 12 हजार रूपये किंमतीचे उग्र व घाण वास येणारे गुळमिश्रीत 900 लिटर रसायन नष्ट केले. तयार असलेली व विक्री होत असलेली 1400 रूपयांची दारू ताब्यात घेतली.

दुसर्‍या प्रकरणात पारेवाडी येथेच भिमाबाई रूपचंद पवार हिच्या घरामागील दारू काढणार्‍या हातभट्टी केंद्रावर धाड टाकून 700 रूपयांची दारू जप्त करून सहा हजार रूपये किंमतीचे दारू काढण्याचे रसायन नष्ट करण्यात आले.

तिसर्‍या केत्तूर क्रमांक दोन येथील गुन्ह्यात नागेश पिंपळे याच्या घरासमोर दारू हातभट्टी काढण्याचे काम चालू होते. यावेळी पोलिसांनी तब्बल 18 हजार रूपयांचे रसायन नष्ट करून 1400 रूपयांची तयार दारू जप्त केली. असे तब्बल 36 हजार रूपयांचे आंबट व उग्र वास येणारे 1 हजार 700 लिटर रसायन नष्ट करण्यात येऊन 3 हजार 500 रूपयांची      विक्री होत असलेली दारू ताब्यात घेतली.

मटका अड्डयावर छापा

याबरोबरच केत्तूर दोन येथील रेल्वेस्टेशनसमोर कल्याण मटका घेत असताना उमेश घोरपडे यास रंगेहाथ पकडून मटक्याचे साहित्य व 1200 रूपये रोख जप्त केले. 
या सर्व गुन्ह्यांचा तपास महमद रफिक पटेल व प्रदीप पर्वते हे करीत आहेत.