Tue, May 21, 2019 12:57होमपेज › Solapur › पालकमंत्र्यांना लिंगायत आरक्षणप्रश्‍नी अपयश!

पालकमंत्र्यांना लिंगायत आरक्षणप्रश्‍नी अपयश!

Published On: Aug 22 2018 12:10AM | Last Updated: Aug 21 2018 11:58PMसोलापूर ः प्रतिनिधी

लिंगायत समाजातील 21 जातींना केंद्रीय ओबीसीचे आरक्षण मिळावे, यासाठी शिवा संघटनेच्यावतीने पाठपुरावा सुरु आहे. केंद्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन झाल्याने हा विषय लवकरच मार्गी लावण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दोन वर्षांखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने राज्य शासनाकडे लिंगायत समाजातील 32 जातींना आरक्षण देण्यासाठी अहवाल सादर न केल्याने पालकमंत्र्यांना समाजाच्या प्रश्‍नी अपयश आल्याचा आरोप शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी केला. 

सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात प्रा. धोंडे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा संघटनेचे पदाधिकारी डॉ. बसवराज बगले, वीरभद्रेश बसवंती, अरविंद भडोळे, मनिष काळजे, संतोष केंगनाळकर, शिवानंद निंबाळकर, महांतेश पाटील, सुरेश तोळरगी आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. धोंडे म्हणाले, शिवा संघटनेच्यावतीने अनेक वर्षांपासून 21 जातींना केंद्रीय ओबीसीचे आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. यासाठी अनेकदा बैठका घेण्यात आल्या. मात्र केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना नसल्याने हा विषय मागील चार वर्षांत रेंगाळला होता. आता हा आयोग स्थापन झाल्याने हा विषय लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रा. धोंडे म्हणाले. 

दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लिंगायत समाजातील 32 जातींना ओबीसीचे आरक्षण मिळण्यासंदर्भातची समिती राज्य शासनाने गठीत केली. या समितीने अद्यापपर्यंत राज्य शासनाकडे अहवाल सादर केला नाही. मध्यंतरी सोलापुरात काशी जगद्गुरु यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा समाजाची बैठक घेऊन आरक्षण देण्याची नौटंकी पालकमंत्री देशमुख यांनी केली, असा आरोपही प्रा. धोंडे यांनी केला.