Mon, Jul 22, 2019 00:44होमपेज › Solapur › चळवळीतील दिग्गज सोलापूरच्या रणांगणात!

चळवळीतील दिग्गज सोलापूरच्या रणांगणात!

Published On: Aug 15 2018 1:27AM | Last Updated: Aug 14 2018 11:07PMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

लोकसभा व विधानसभा निवडणुकांना वर्षभराचा अवधी असतानाच जिल्ह्यातील वातावरण तापू लागले आहे. आंबेडकरी चळवळीतील दिग्गज नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. शरद बनसोडे, खा. अमर साबळे यांच्या उमेदवारीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे रणांगण गाजणार आहे.

भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून ते 28 सप्टेंबरला बहुजन वंचित आघाडीची जंगी सभा घेत आहेत. या सभेत त्यांच्या उमेदवारीबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

अ‍ॅड. आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने काँग्रेससोबत युतीसाठी चर्चा सुरु केली असली तरी  अद्याप निर्णय झालेला नाही. अशातच अ‍ॅड. आंबेडकर यांनी सोलापुरातून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने काँग्रेससोबत युती झाल्यास सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीचे काय?, असाही प्रश्‍न चर्चिला जात आहे. काँग्रेससोबत युती न झाल्यास अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे, खा. शरद बनसोडे अथवा खा. अमर साबळे असा तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. 

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरशी संपर्क वाढविल्याने  लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा झडत आहेत. मागील महिन्याभरापूर्वीच अ‍ॅड. आंबेडकर यांनी सोलापुरात सभा घेतली होती. या सभेत कार्यकर्त्यांनी सोलापूर येथून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरल्याने अ‍ॅड. आंबेडकर यांनीही या मागणीला अनुकूलता दर्शवत मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

28 सप्टेंबरला सोलापुरात सभा

बहुजन वंचित आघाडीतर्फे येत्या 28 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे अ‍ॅड. आंबेडकर यांच्या उपस्थितीत विराट सभा होत आहे. याची जय्यत तयारी सुरु आहे. याअनुषंगाने पुणे येथे अर्जुन सलगर, विक्रांत गायकवाड, बबन शिंदे, श्रीशैल्य गायकवाड यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक झाली. 

आंबेडकरी राजकारणात सळसळ

अ‍ॅड. आंबेडकर यांनी सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे सूतोवाच दिल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत बोलताना खा.  साबळे, खा. बनसोडे यांनी त्यांची जादू चालणार नसल्याचे भाकित वर्तवले आहे. असे असले तरी विद्यमान खासदारांसह रिपाइंच्या अन्य नेत्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतीही तयारी सुरु केल्याचे दिसत नाही.

सोलापुरात होणार चुरशीचा सामना

अ‍ॅड. आंबेडकरांनी निवडणुकीपूर्वीच सभांचा धडाका लावल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. सुशीलकुमार शिंदे यावेळी स्वतः निवडणूक लढविणार की आ. प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देणार, हे अद्याप स्पष्ट नाही. खा. अमर साबळे यांनीही सोलापुरातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विद्यमान खा. शरद बनसोडे हे सध्या शांत असले तरी त्यांनीही पुन्हा या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याचा चंग बांधला आहे. एकूणच दिग्गज नेत्यांच्या उमेदवारीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत चुरशीचा सामना होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.