Fri, Jul 19, 2019 16:13होमपेज › Solapur › ‘पडक्या वाड्याचा पाटील’ पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत!

‘पडक्या वाड्याचा पाटील’ पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत!

Published On: Feb 15 2018 10:31PM | Last Updated: Feb 15 2018 8:53PMसोलापूर ः बाळासाहेब मागाडे

माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतल्यानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रा. ढोबळे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘मी पडक्या वाड्याचा अडगळीत पडलेला पाटील’ अशा शब्दांत प्रा. ढोबळे यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात व्यक्‍त केलेली खंत यानिमित्ताने अधोरेखीत झाली आहे.

प्रा. ढोबळे यांची राजकीय कारकीर्द एका अर्थाने यशस्वीच राहिली आहे. पाणीपुरवठा मंत्री, पालकमंत्री अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. मंगळवेढा व मोहोळ मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रा. ढोबळे यांनी विधानसभेत यशस्वी नेतृत्त्व केले. मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीत एका केसमध्ये त्यांचे नाव पुढे आल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ओहोटी लागली. त्याचे पर्यवसान मोहोळी विधानसभा मतदारसंघाचे तिकीट गमावण्यात झाले. त्यांना अलगद बाजूला ठेवून अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष व प्रा. ढोबळेंचे एकेकाळचे सहकारी रमेश कदम यांना तिकीट देण्यात आले. तेव्हापासून प्रा. ढोबळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दुरावा वाढत गेला. प्रा. ढोबळे यांनी बंड करून कदम यांच्याविरोधात निवडणूक लढविली खरी. मात्र त्यात त्यांना मोठ्या मताधिक्याने हार पत्करावी लागली. यानिवडणुकीनंतर प्रा. ढोबळे हे भाजपशी सतत सलगी करताना दिसून येत आहेत.

मातंगांना एकत्र करण्याचा प्रयत्न

एससी प्रवर्गात समाविष्ठ असलेल्या मातंग समाजाला त्याच प्रवर्गात स्वतंत्र ‘अ.ब.क.ड.’ वर्गवारी करुन स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी करून प्रा. ढोबळे यांनी पुन्हा मातंग समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मध्यंतरी त्यांनी नागपूरात भव्य मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. मात्र याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या सामाजिक प्रतिमेवर झाला. आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांनी प्रा. ढोबळे यांच्या या सवता-सुभ्याला विरोध करीत स्वतंत्र आरक्षणाची मागणी चुकीची असल्याचे मत मांडले. त्यांच्या आरक्षणाच्या मागणीचे हे त्रांगडे सामाजिक वातावरण ढवळून काढताना दिसत आहे. त्यातच त्यांनी भाजपप्रवेशासाठी चालविलेले प्रयत्न संभ्रमात भर घालताना दिसत आहेत.

कार्यकर्ते संभ्रमात

तडाखेबाज भाषणे करून एकेकाळी स्टार प्रचारक राहिलेले प्रा. ढोबळे हे फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा सोडून राजकीय पुनर्वसनासाठी भाजपात जाणार असल्याच्या चर्चेने त्यांचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत.

भाजपवासी होण्यासाठी आटापिटा

प्रा. ढोबळे व राष्ट्रवादी पक्षात कमालीचा दुरावा निर्माण झाला आहे. मोहोळ मतदारसंघात स्थानिक नेत्यांकडून त्यांच्या उमेदवारीला होणारा विरोध पाहता त्यांना मोहोळमध्ये पुन्हा संधी मिळण्याबाबत साशंकता आहे. ही राजकीय परिस्थिती हेरून प्रा. ढोबळे यांनी आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपची चाचपणी सुरु केली. भाजपप्रवेश झाल्यास एस.सी.साठी आरक्षित असलेला मोहोळ विधानसभा मतदारसंघ किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, असा त्यांना आशावाद आहे. यातूनच ते भाजपवासी होण्यासाठी आटापिटा करीत असल्याची चर्चा आहे.