Thu, Jun 20, 2019 00:34होमपेज › Solapur › अकलूजच्या लावणी स्पर्धेला ब्रेक! 

अकलूजच्या लावणी स्पर्धेला ब्रेक! 

Published On: Dec 30 2017 7:25PM | Last Updated: Dec 30 2017 7:29PM

बुकमार्क करा
धनाजी सुर्वे : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रासह अमेरिका, दुबईतील रसिकांना ठेका धरायला लावणारी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील लावणी-नृत्य स्‍पर्धा बंद होणार आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अकलूजला गेल्‍या २५ वर्षांत या स्‍पर्धेने वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. पण, या लावणी स्पर्धेची परंपरा आता खंडीत होणार आहे. लावणी स्‍पर्धेने ठरावीक उंची गाठल्‍याने या स्‍पर्धा बंद करण्याचा निर्णय, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना सांगितले. 

अकलूजमध्ये १९९३ ला सुरु केलेल्‍या या स्‍पर्धेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्‍पर्धेमुळे अनेक कलाकारांना हक्‍काचे व्यासपीठ मिळाले. पारंपरिक लावणीला या स्पर्धेमुळे खऱ्या अर्थाने नव संजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षांत लावणी ही लोककला लोप पावत होती. पण,  राज्यातील लावणी रसिकांना जानेवारी महिना आला की, अकलूजचा लावणी महोत्‍सवाची आठवण व्हायची. मात्र, यंदा या स्‍पर्धेचे अखेरचे वर्षे असल्‍यामुळे रसिकांसह कलाकारांनीही नाराजी व्यक्‍त केली आहे.

लावणीची २५ वर्षे

महाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात. एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे. मात्र, या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी मिळाली नाही. त्‍यामुळे महाराष्‍ट्राच्या मातीत लावणी टिकून राहावी, नव्या पिढीला या कलेतील बाज उमगावा, अशा विविध विचारांतून जयसिंह मोहिते-पाटील यांनी १९९३ ला ही स्पर्धा सुरू केली. 

लावणीला प्रतिष्‍ठा मिळाली 
लावणी तमाशा म्हटलं की नाकं मुरडली जायची. विशेषतः शहरी भागात त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जायचे. मात्र, या कलेला प्रतिष्ठा मिळवून द्यायची, या हेतूने सुरु केल्‍या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. खूप कमी कालावधील अकलूजची लावणी देशच नव्हे तर, देशाबाहेरही पोहचली आणि या स्पर्धेने लावणीला समाज मनात एक वेगळे स्‍थान निर्माण करून दिले.  ही लावणी स्पर्धा सर्वांनाच हवी हवीशी वाटू लागली आणि स्पर्धा सुरु करण्यामागचा जयसिंह मोहिते-पाटील यांचा हेतू सफल झाला. 

स्‍पर्धेचे यंदाचे अखेरचे वर्षे 
यंदा तीन जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. यंदाची ही शेवटची स्पर्धा असेल असे जयसिंह मोहिते-पाटील यांनी जाहीर केले आहे. लोक कलावंतांचे प्रतिष्ठीत, हे व्यासपीठ बंद होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे. या स्पर्धेला राज्यभरातून लावणी रसिक हजेरी लावतात. ही स्पर्धा बंद करू नका, अशी विनवणी रसिक जयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे करत आहेत. 

आई आणि पत्‍नीच्या हस्‍ते कलावंतांना साडी-चोळी 
जयसिंह मोहिते-पाटील यांनी ही स्‍पर्धा सुरु केल्‍यापासूनच आपल्‍या आई आणि पत्नीच्या हस्ते कलावंतांना साडी-चोळी करून सन्मानित करण्याची पद्धत सुरू केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर, वृध्द कलावंतांची फरपट थांबवण्याठी त्‍यांना दर महिना पाच हजार रूपयांची पेन्शन योजनाही सुरू केली. महाराष्‍ट्र सरकारकडून यासाठी कोणत्‍याही प्रकारची मदत झाली नाही आणि जयसिंह मोहिते-पाटील यांनी, तशी अपेक्षाही कधी ठेवली नाही. सढळ हाताने कलाकारांना मदत करत महाराष्‍ट्रातली लावणी जगवण्याचे महान कार्य त्‍यांनी केले. 

पहिल्‍या रांगेत महिलांना स्‍थान 
लावणी म्‍हटले की, ती फक्‍त पुरुषांनीच पाहायची, स्‍त्रीयांनी लावणी पाहणे म्‍हणजे प्रतिष्‍ठेला धोका, अशा विविध विचारांतून लावणी फक्‍त पुरुषांनीच पहायाची ही प्रथा  या स्‍पर्धेने मोडीत काढली. पहिल्यांदा स्‍वत: च्या घरातील महिलांना लावणी पाहण्याची परवानगी देऊन लावणी ही महिलांनीही पाण्याचा कला प्रकार असल्‍याचा जयसिंह मोहिते-पाटील यांनी पायंडा पाडला. त्‍यांच्या या निर्णयाने सोलापूर जिल्‍ह्यासह संपूर्ण महाराष्‍ट्रातील लावणी रसिक स्‍त्रीयांनी या लावणी स्‍पर्धेचा आनंद लुटला. या स्‍पर्धेतील कौतुकाची बाब म्‍हणजे, स्‍पर्धा पाहण्यासाठी आलेल्‍या महिला रसिकांना पहिल्‍या रांगेत राखीव जागा असायची. महिला लावणी पाहत असलेली अकलूजची लावणी स्‍पर्धा ही देशातील पहिली लावणी स्‍पर्धा ठरली.  

शिटृी वाजवण्यास बंदी
लावणी म्‍हणजे एक विभत्‍स प्रकार, लावणीत शिटृी वाजवायची, पैसे उडवायचे, फेटे उडवायचे या गैरसमजुतीतून लावणीकडे चुकीच्या पध्दतीने पाहिले जायचे. मात्र, अकलूजच्या स्‍पर्धेत अशा प्रकारांना बंदी होती. त्‍यामुळे या स्‍पर्धेने लावणीकडे पाहण्याचा समज बदलला आणि या स्‍पर्धेने रसिकांच्या मनात घर केले. 

‘‘स्‍पर्धेला एक उच्च पातळी प्राप्त झाली आहे. कोणती गोष्‍ट कोठे थांबवायची हे आपल्‍याला समजले पाहिजे. हे लक्षात घेऊन आम्‍ही स्‍पर्धा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लावणी स्‍पर्धा सुरू ठेवण्यास आम्‍हाला काही अडचण नाही. आम्‍हालाही ही स्‍पर्धा बंद करावी वाटत नाही. स्पर्धेत गायक, वादकांना स्‍पर्धकांकडून मानधन दिले जायचे. पण, गेल्या काही वर्षांत गायक आणि वादक जादा मानधनाची मागणी करू लागले आहेत. स्पर्धकांना आता ते परवडत नाही. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने भरवण्यात येणाऱ्या स्‍पर्धा बंद होत असल्‍या तरी, महाराष्‍ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि लावणी कलावंत त्‍यांच्या वतीने स्‍पर्धा सुरु करण्याचा विचार करत आहेत.’’ 

    जयसिंह मोहिते-पाटील (अध्यक्ष सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती)  

‘‘अकलूजच्या लावणीने कलावंताना हक्‍काचे व्यासपीठ उपलब्‍ध करून दिले. या स्‍पर्धा बंद होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. या स्‍पर्धेमुळे आमची कला जिवंत राहिली आहे.’’

मंगला बनसोडे (लावणीसाम्राज्ञी)