Fri, Sep 21, 2018 12:06



होमपेज › Solapur › ‘शिवशाही’ला लातूरजवळ अपघात; एक प्रवासी गंभीर

‘शिवशाही’ला लातूरजवळ अपघात; एक प्रवासी गंभीर

Published On: Jun 17 2018 10:41PM | Last Updated: Jun 17 2018 10:11PM



लातूर : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला रविवारी पहाटे अपघात झाला. भरधाव वेगातील ही बस मुरूड (ता. लातूर) नजिक एका पुलाच्या कठड्यावर चढली व बसमधील एक प्रवासी बाहेर फेकला गेला. तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लातुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर-नांदेड शिवशाही (एमएच 03 सीपी 4544) ही  लातूरमार्गे नांदेडकडे येत होती. ती मुरुड शहराजवळ असलेल्या नाल्यावरील पुलाजवळ आली असता चालकाचा ताबा सुटला व बस थेट पुलाच्या कठड्यावर घुसली. 

काही फूट तशीच पुढे जाऊन पुलावर लटकली. यावेळी बसच्या दारात उभा असलेला प्रवासी राजेश गणपत देवसरकर (रा. देवसरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ, ह. मु. पंढरपूर) हा वेगात बाहेर फेकला गेला. तर बसमधील प्रवाशांनाही किरकोळ मार लागला. 

देवसकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने लातूरच्या शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. 

बसमध्ये तेरा प्रवासी होते. अपघाताची माहिती कळताच त्या परिसरातील नागरिक अपघातस्थळी धावले व त्यांनी संकटकालीन खिडकीतून प्रवाशांना बाहेर काढल्याचे मुरुड पोलिसांनी सांगितले.